मुंबई : काळाचौकी, अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) ची अर्थात विकासकाच्या नियुक्तीसाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. ६३५ चौ. फुट क्षेत्राप्रमाणे निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने आधीची निविदा रद्द करून तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार अभ्युदय नगरमधील रहिवाशांना किमान ६२० चौ. फुटाचे घर मिळणार आहे.

अंदाजे ३३ एकर जागेवर वसलेल्या अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीत एकूण ४९ इमारती असून त्यात ३३५० सदनिकांचा समावेश आहे. या इमारती जुन्या झाल्याने इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. पुनर्विकासाची प्रक्रिया सोसायटीकडून सुरु करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि पुनर्विकास रखडला. अखेर रखडलेला हा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंडळाने मोतीलाल नगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची नियुक्ती करत अर्थात सी अँड डी प्रारुपानुसार पुनर्विकास मार्गी लावण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई मंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुंबई मंडळाने आॅक्टोबर २०२४ मध्ये कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीची नियुक्ती करण्याकरीता निविदा प्रसिद्ध केली. या निविदेनुसार रहिवाशांना किमान ६३५ चौ. फुट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राच्या सदनिका देणाऱ्या विकासकाची नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र या निविदेला विकासकांचा प्रतिसाद न मिळाल्याने निविदेला तब्बल सात वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली. सात वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रद्द करून दुसऱ्यांदा नव्याने निविदा काढण्यात आली. मात्र त्या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मंडळाने निविदेबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतची विचारणा एका प्रस्तावाद्वारे थेट राज्य सरकारकडे केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रस्तावाद्वारे ६३५ चौ. फुट क्षेत्राची घरे रहिवाशांना देणे विकासकांना परवडत नसल्याने विकासक पुढे येत नसल्याने त्याबाबत काय निर्णय घ्यावा अशी विचारणा मंडळाने केली होती. त्यानुसार राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी ६३५ चौ. फुटांऐवजी किमान ६२० चौ. फुटाची घरे देत नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार निविदेत आवश्यक तो बदल करून बुधवारी नव्याने तिसऱ्यांदा अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या निविदेप्रमाणे रहिवाशांना ६२० चौ. फुटापेक्षा अधिक क्षेत्राची घरे देणाऱ्या विकासकाची सी अँड डी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. गुरुवारपासून इच्छुक विकासकांना, विकासक कंपन्यांना निविदा सादर करता येणार असून निविदा सादर करण्याची अंतिम तारख १३ जून अशी असणार आहे. तेव्हा आता तिसऱ्या निविदेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.