मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी डोंगर उतारावर झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात आणि काही नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरड कोसळण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने दरडप्रवण क्षेत्र निश्चित करून तेथे संरक्षक भिंती उभारण्याची जबाबदारी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. ९ मीटरच्या आतील भिंतीचे काम झोपडपट्टी सुधार मंडळ, तर ९ मीटरच्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करण्यात येतो.
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८५ ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या १४ ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याची कामे सुरू आहेत. अंदाजे १०० ठिकाणी कामाला सुरुवात करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. पासवाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तेथे तात्पुरत्या संरक्षित जाळ्या बसविण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्देशानुसार तातडीने संरक्षित जाळ्या बसविण्याची ठिकाणी निश्चित करून पहिल्या टप्प्यात १० ठिाकणी जाळ्या बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिली. गुरुनानक एरिया (एसबीएस मार्ग), जरीमरी साकीनाका (कुर्ला), हबीब नगर (अंधेरी), शांताराम तलाव (दिंडोशी), टाईम्स इंडिया इमारतीच्या मागे (कांदिवली), आदर्श चाळ (कांदिवली), उपाध्याय नगर (अंधेरी), रामगृह, श्रीराम मंदिर, श्री वैष्णव आश्रम (जोगेश्वरी), काकड इस्टेट सिद्धार्थ नगर (वरळी) आणि वाडी बंदर (डाॅकयार्ड) या १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत.
झोपडपट्टी सुधार मंडळाकडून संरक्षित भिंती बांधण्याची कामे केली जातात. पण आतापर्यंत कधीही संरक्षित जाळ्या बसविण्याचे काम करण्यात आलेले नाही. मात्र अतिधोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेत म्हाडाने स्वनिधीतून संरक्षित भिंती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी म्हाडाच्या निधीतून ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षित जाळ्या बसविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून निधी उपलब्ध करण्यात येतो. त्यानुसार म्हाडाकडून खर्च करण्यात आलेला निधी पालिकेकडून वसूल केला जाण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत असून या ठिकाणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तातडीने जाळ्या बसविण्याच्या ठिकाणांचा शोध अभियंत्यांकडून घेतला जात आहे. अन्य ठिकाणी जाळ्या बसविण्यासाठी म्हाडाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळली तरी या संरक्षित जाळ्यांमुळे त्याचा फटका झोपड्यांना, झोपडपट्टीवासियांना बसणार नाही, असा दावा यानिमित्ताने झोपडपट्टी सुधार मंडळाने केला आहे.