निशांत सरवणकर, लोकसत्ता
मुंबई : सामान्यांसाठी राज्यात किमान दोन लाख घरे निर्मिती करण्याचा संकल्प असल्याचे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. म्हाडा ही परवडणारी घरे बांधणारी संस्था असल्यामुळे सामान्यांसाठी अधिकाधिक घरे कशी निर्माण होतील, या दिशेनेच धोरण राबविले जाईल, असेही जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था राबविण्यासही त्यांनी प्राधान्य दिले आहे. कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या विविध प्रकारच्या सूचनांसाठी आपल्या कार्यालयात एक सूचना पेटीही बसविली आहे. अलीकडेच म्हाडाच्या मुंबई मंडळाने चार हजार ८२ घरांसाठी सोडत प्रक्रिया राबविली. पहिल्यांदाच कुठलाही मानवी हस्तक्षेप न होता सोडत काढण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाने घरांचा साठा वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे म्हटले होते. तोच धागा पकडून म्हाडाकडून यापुढे धोरण राबविले जाईल, असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-Monsoon Update: मुंबईत मुसळधार पाऊस
ठाणे महापालिका आयुक्त म्हणून जैस्वाल यांनी कामाचा धडाका लावला होता. मुंबई महापालिकेतही अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी करोना काळात काम केले होते. जैस्वाल यांची म्हाडात नियुक्ती झाली. परंतु सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलाविल्याने पदभार स्वीकारताच सुरुवातीचा त्यांचा काळ धावपळीत गेला. आता ते स्थिरस्थावर झाले असून विविध पातळ्यांवर त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
म्हाडाकडून सामान्यांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे म्हाडाने अधिकाधिक घर निर्मिती केलीच पाहिजे. आपण त्या दिशेनेच कामकाज सुरू केले आहे. म्हाडाच्या विविध योजनांतून अधिकाधिक घरे कशी निर्माण होतील, यावरच आपला भर राहणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. म्हाडाचे एकूण ११४ अभिन्यास असून म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून सामान्यांसाठी घरांचा साठा निर्माण करणे यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. म्हाडाच्या मोतीलाल नगरपाठोपाठ अभ्युदयनगर (काळा चौकी), आदर्शनगर (वरळी) तसेच वांद्रे रिक्लेमेशन या वसाहतींमध्ये कन्स्ट्रक्शन अँड एजन्सी यामार्फत पुनर्विकास योजना राबवितानाही घरांचा साठा वाढविण्यावरच भर देण्यात आला आहे. सामान्यांसाठी अधिकाधिक घरे सोडतीत कशी उपलब्ध होतील, या दिशेने आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-महापालिका अधिकारी रमाकांत बिरादार यांची सात तास चौकशी; मृतदेह पिशव्या गैरव्यवहार प्रकरण
बीडीडी चाळ पुनर्विकास या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुनर्वसनाच्या इमारती लवकरात लवकर उभ्या करून त्याचा ताबा रहिवाशांना देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर असून ते अधिक गतिमान केले जाईल, असे जैस्वाल यांनी सांगितले. घरांच्या सोडतीपाठोपाठ म्हाडातील इतर सेवाही सामान्यांसाठी सुलभ कशा होतील आदी बाबींवर आपण भर देणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.