निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : सामान्यांसाठी राज्यात किमान दोन लाख घरे निर्मिती करण्याचा संकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) आखला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली. म्हाडा ही परवडणारी घरे बांधणारी संस्था असल्यामुळे सामान्यांसाठी अधिकाधिक घरे कशी निर्माण होतील, या दिशेनेच म्हाडाचे धोरण राबविले जाईल, असेही जैस्वाल यांनी स्पष्ट केले. याशिवाय कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या विविध प्रकारच्या सूचनांसाठी म्हाडा उपाध्यक्षांच्या  कार्यालयात सूचना पेटीही बसविण्यात आली आहे.

हेही वाचा >>> म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर आणि अमरावती मंडळाचा कारभार आता पूर्णत ऑनलाईन

अलीकडेच म्हाडाच्या मुंबई मंडळाने चार हजार ८२ घरांसाठी सोडत प्रक्रिया राबविली. पहिल्यांदाच कुठलाही मानवी हस्तक्षेप न होता सोडत काढण्यात आली. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाने घरांचा साठा वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे म्हटले होते. या पार्श्वभूमावर म्हाडाने धोरण आखण्याचे ठरविले आहे. म्हाडाकडून सामान्यांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे म्हाडाने अधिकाधिक घर निर्मिती केलीच पाहिजे. त्या दिशेनेच कामकाज सुरू केले आहे. म्हाडाच्या विविध योजनांतून अधिकाधिक घरे कशी निर्माण होतील, यावरच भर राहणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. म्हाडाचे एकूण ११४ अभिन्यास असून म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून सामान्यांसाठी घरांचा साठा निर्माण करणे यालाच प्राधान्य दिले जाणार आहे.

हेही वाचा >>> धारावी पुनर्विकासाची किनार की पक्षांतर्गत नाराजी? काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

म्हाडाच्या मोतीलाल नगरपाठोपाठ अभ्युदयनगर (काळा चौकी), आदर्शनगर (वरळी) तसेच वांद्रे रिक्लेमेशन या वसाहतींमध्ये कन्स्ट्रक्शन अँड एजन्सी यामार्फत पुनर्विकास योजना राबवितानाही घरांचा साठा वाढविण्यावरच भर देण्यात आला आहे. सामान्यांसाठी अधिकाधिक घरे सोडतीत कशी उपलब्ध होतील, या दिशेने आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बीडीडी चाळ पुनर्विकास या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुनर्वसनाच्या इमारती लवकरात लवकर उभ्या करून त्याचा ताबा रहिवाशांना देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर असून ते अधिक गतिमान केले जाईल, असेही जैस्वाल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘म्हाडा मुंबईत एक लाख घरे वितरीत करणार’ म्हाडा मुंबईत वर्षभरात एक लाख घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सोमवारी सांगितले. त्यामुळे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. जे विकासक चार हजार चौरस मीटरहून अधिक बांधकाम करतात, त्यांना म्हाडाला २० टक्के घरे देण्याचे बंधन आहे. या माध्यमातून मिळणारी घरे उपलब्ध होतील, त्यानुसार ती लॉटरी काढून वितरीत केली जातील, असे सावे यांनी स्पष्ट केले.