लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत गुरूवारी दुपारी १२ वाजता संपुष्टात येणार होती. ही मुदत संपुष्टात येण्यास काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना मुंबई मंडळाने अर्ज भरण्याच्या मुदतीत १२ तासांची वाढ करत इच्छुक अर्जदारांना दिलासा दिला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध असतील पण काही कारणांमुळे गुरूवारी १२ वाजेपर्यंत अर्ज करु शकले नाहीत, ते आता रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज भरु शकणार आहेत. अर्ज भरून अनामत रक्कमेसह गुरूवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली. ४ सप्टेंबरला अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येणार होती. मात्र महागडी घरे आणि इतर अनेक कारणांमुळे अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार आज गुरूवारी दुपारी ११.५९ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार होती. तर अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत रात्री ११.५९ वाजता संपणार आहे. असे असताना अर्ज भरण्याची दुपारी ११.५९ वाजेपर्यंतची मुदत संपण्यापूर्वी मुंबई मंडळाने अर्ज भरण्याच्या मुदतीत १२ तासांची वाढ केली असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार आता गुरुवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर याच कालावधीपर्यंत अर्ज भरणाऱ्यांनी अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करणे आवश्यक असणार आहे. आज रात्री ११.५९ वाजल्यानंतर अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया बंद होणार आहे.

आणखी वाचा-मुंबई :डॉ. अजित रानडे उच्च न्यायालयात, नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाची सोमवारपर्यंत अंमलबजावणी न करण्याचे आदेश

दरम्यान अर्जविक्री-स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुरूवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एक लाख २३ हजार अर्ज भरले आहेत. तर त्यातील अंदाजे ९७ हजार अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आता गुरूवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जस्वीकृतीची संख्या एक लाखांचा पल्ला पार करते का याकडे मुंबई मंडळाचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडत…

अर्जविक्री-स्वीकृती संपुष्टात आल्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून ३ ऑक्टोबरला पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल. या सोडतीत किती आणि कोण अर्जदार यशस्वी ठरणार हे ८ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. ८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे.