मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) एमएचटी सीईटी अभ्यासक्रमाच्या भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम गट) गटाचा निकाल रविवारी रात्री १२.१५ च्या सुमारास संकेतस्थळावर जाहीर केला. या परीक्षेमध्ये राज्यासह देशभरातील २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले. पुण्यातील सर्वाधिक चार, तर मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले. अन्य राज्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले असून त्यात नवी दिल्ली, जयपूर आणि कोलकाता येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहेत.

सीईटी कक्षाने एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम गट) या गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिलदरम्यान घेतली होती. तसेच २७ एप्रिल रोजी अखेरच्या सत्रात झालेल्या गोंधळामुळे ५ मे रोजी पुन्हा अतिरिक्त परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा राज्यातील २०७ केंद्रांवर, तर परराज्यांतील १७ केंद्रांवर झाली होती. पीसीएम गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाचा निकाल रविवारी रात्री १२.१५ च्या सुमारास विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये जाहीर करण्यात आला. पीसीएम गटामध्ये २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यामध्ये पुण्यातून ४, मुंबई व ठाण्यातील प्रत्येकी तीन, सांगली व नांदेडमधील प्रत्येकी दोन आणि यवतमाळ, कोल्हापूर, भंडारा आणि गोंदियामधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सीईटी कक्षाच्या संकेतस्थळाला भेट देतात. त्यामुळे संकेतस्थळ कोलमडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदा रविवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. त्यामुळे सोमवारी दिवसभर विद्यार्थ्यांना निकाल सुरळीतपणे पाहणे शक्य झाल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. दरम्यान, भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी गट ) गटाचा निकाल १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

पहाटे ५ पर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी पाहिला निकाल

रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्री निकाल पाहण्यास पसंती दिली. रात्री १२.१५ पासून पहाटे ५ वाजपेर्यंत जवळपास १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनीस्वत:च्या लॉगिनमध्ये जाऊन निकाल पाहिला. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर सोमवारी ताण आला नाही, असे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परराज्यातील चार विद्यार्थ्यांनी मिळवले १०० पर्सेंटाईल गुण

एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटामध्ये राज्यातील १८, तर परराज्यातील चार विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यामध्ये नवी दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांचा, तर जयपू व कोलकातामधील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.