मुंबई : एमएचटी सीईटीने दिलेल्या ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांपैकी अभियांत्रिकीसाठी तब्बल २ लाख १३ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २८ जून ते १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.
सीईटी कक्षातर्फे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा यंदा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत विविध सत्रांमध्ये घेण्यात आली. त्यानंतर अखेरच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेत काही प्रश्न चुकीचे होते. याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर त्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ५ मे रोजी अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली. एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसानयशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
या परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सीईटी कक्षातर्फे २७ जून रोजी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार २८ जूनपासून प्रवेश प्रक्रियेसाठीच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला ८ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर नोंदणी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर १४ जुलैपर्यंत ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांपैकी २ लाख १३ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.
एमबीए अभ्यासक्रमासाठी ४९ हजार ९३० विद्यार्थ्यांची नोंदणी
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी २८ जूनपासून सुरूवात करण्यात आली. २८ जून ते १४ जुलै या कालावधीमध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी ४९ हजार ९३० विद्यार्थ्यांनी नोंदणी १४ जुलैपर्यंत नोंदणी केली आहे. एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा १ ते ३ एप्रिल या दिवशी सहा सत्रांमध्ये घेण्यात आली.
एमबीए सीईटीसाठी राज्यभरातून १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एमबीए सीईटीचे निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला. एमबीएसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त असून, त्यातील ४९ हजार ९३० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून नोंदणी निश्चित केली आहे.
अभियांत्रिकी व एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक
- नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर – १८ जुलै
- हरकती नोंदविण्यासाठी मुदत – १९ ते २१ जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर – २४ जुलै