विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. देवरा यांच्यासाठी शिंदे गट, दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असला तरी भाजप हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. यामुळेच भाजप आणि शिंदे गटात दक्षिण मुंबई मतदारसंघावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. अरविंद सावंत हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर सावंत हे ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा सोडण्याची शक्यता नाही. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याचे समजते. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जाते. गेल्या वेळी या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने महायुतीमध्ये ही जागा मिळावी, अशी शिंदे गटाची इच्छा आहे.

दिल्लीतील राजकारणासाठी महत्त्व

शिवसेनेच्या शिंदे गटाचा नवी दिल्लीत कोणीही चेहरा नाही. मिलिंद देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटाने त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे निश्चित केले आहे. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समजते. देवरा यांच्यासाठी शिंदे गट दक्षिण मुंबईत आग्रही असला तरी भाजप ही जागा सोडण्यास तयार नाही. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. नार्वेकर यांची तयारी आहे. लोढा यांनाही खासदारकीची इच्छा आहे. भाजपकडून ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याला पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाकरे गटातील हा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप या दोघांच्याही संपर्कात आहे.

ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजप आणि शिंदे गट उभयतांनी दावा केल्यास एकाला माघार घ्यावी लागेल. मुंबईतील सहापैकी तीन जागांवर गे्ल्या वेळी शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. यापैकी दोघे शिंदे यांच्याबरोबर तर एक जण ठाकरे गटासोबत आहे. भाजप मुंबईत शिंदे गटाला तीन जागा सोडण्यास तयार नसल्याचे समजते. यातूनच दक्षिण मुंबईची जागा देवरा यांना सोडून भाजप कदाचित शिंदे यांचा प्रस्ताव मान्य करू शकते.