मुंबईच्या अंधेरी-पार्ले या भागात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करणाऱ्या टोळीला अटक करण्यात अंधेरी, पार्ले पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे या भेसळयुक्त दुधाचे रॅकेट उघडकीस आणण्यात मुंबई ग्राहक पंचायतीने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. या टोळीने केवळ भेसळयुक्त दूधच नाही, तर दूध पुरवठा करणाऱ्या बडय़ा कंपन्यांच्या बनावट पिशव्या तयार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ मांडला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक जास्त बनावट पिशव्या हस्तगत झाल्या आहेत. या पिशव्यांमध्ये अमुल, गोकुळ, वारणा, भक्ती आणि कृष्णा या कंपन्यांच्या पिशव्यांचा समावेश आहे.
गेले चार महिने मुंबई ग्राहक पंचायत ‘शुद्ध दूध, आपला अधिकार’ या विषयावर काम करत आहे.  याच दरम्यान १९ नोव्हेंबर रोजी कोलडोंगरी परिसरात एक दुधवाला भेसळयुक्त दूध विकत असल्याची कुणकुण विनायक बाणायत या तरुणाला लागली. बाणायत यांनी अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दुधवाल्याकडे सापडलेल्या पिशव्यांची चाचणी करण्यासाठी पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी यापैकी काही पिशव्या गोकुळ आणि अमुल या दोन डेअरींकडे पाठवल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणी सदस्या शुभदा चौकर यांनी दिली.
या अहवालात या पिशव्या बनावट असल्याचे आले.२८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी रामू मुडसू या दुधवाल्याला अटक केली. मात्र त्याचा साथीदार शंकर सापडत नव्हता. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी पाल्र्यात मोठय़ा प्रमाणावर कारवाई करून चार जणांना अटक केल्याचे समजते.
त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी फटांगरे यांनी याबाबत लक्ष घातले. या आरोपींकडे दुधाच्या पिशव्या सील करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्रीही होती. फटांगरे यांनी रमेश सायलू झाला, महेंद्र सायलू झाला, ईलेश बोना आणि शंकर यांना अटक केली. या सर्व आरोपींकडे मिळून पाच हजारांहून अधिक बनावट पिशव्या आढळल्या आहेत.