मुंबई : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव -पाटील यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे.

एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी व विभागाने पथके स्थापन करून पंचनाम्यांचे काम पूर्ण करावे, अशा सूचना मंत्री जाधव यांनी दिल्या आहेत.

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना बारा हजार कोटींची मदत

अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे २०२३-२४ मध्ये बाधित झालेल्या ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी रुपये, तर एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी आणि १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांनी दिली.