राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नियम डावलून दरकरार पद्धतीने जिल्हा परिषद शाळांसाठी अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याला मान्यता दिल्यावरून निर्माण झालेल्या वादावर खुलासा करण्यासाठी मंगळवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वतः तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी या तिघांनी सरकारची बाजू उचलून धरताना जर एकही रुपयाची खरेदी झालेली नाही, तर गैरव्यवहार झाल्याचा आरोपच होऊ शकत नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी कपोलकल्पित आरोपांची शृंखला सध्या सुरू आहे, असे सांगून असेच सुरू राहिले तर आम्हाला कोणताही निर्णय न घेता हाताची घडी घालून शांत बसावे लागेल, असे स्पष्टीकरण दिले.
मुनगंटीवार म्हणाले, कोणत्याही कागदपत्राविना आरोप करून राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. शिक्षण विभागाने पाठविलेल्या फाईलमध्ये अर्थ विभागाने त्रुटी काढल्यावर ती पुन्हा अर्थ विभागाकडे पाठविण्यात आली नाही. त्याचबरोबर संबंधित खरेदी न करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. जर एक रुपयाचीही खरेदी करण्यात आली नाही, तर मग गैरव्यवहार कसा काय होऊ शकतो. केवळ गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो आहे.
गेल्या सरकारने याच पद्धतीने राज्यातील २७ हजार शाळांसाठी अग्निशमन यंत्रांची खरेदी केली होती. त्यावेळी कोणी काही आक्षेप घेतला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सरकारने पारदर्शकपणे घेतलेल्या निर्णयांवरही टीका करण्यात येणार असेल, तर मग आम्हाला कोणतेही काम न करता हाताची घडी घालून बसावे लागेल, असेही ते म्हणाले.
स्वतः तावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना अर्थ विभागाच्या मान्यतेशिवाय एक पैसादेखील कंत्राटदाराला देण्यात आलेला नाही. अर्थ विभागाकडे फाईल जाणे हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. यामध्ये एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसल्याचे सांगितले.