मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) तर्फे आता मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपवरून तिकीट घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा PeLocal Fintech Pvt. Ltd. यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉटसअॅप अकाउंट वरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात.
WA तिकिटासाठी काय करावं?
WA तिकिटासाठी “Hi” हा संदेश +९१ ९८७३०१६८३६ या क्रमांकावर पाठवू शकतात किंवा स्थानकांवर लावलेल्या QR कोडला स्कॅन करून काही क्षणांतच आपलं तिकिट आपल्याला उपलब्ध होतं
अश्विनी भिडे यांनी या सेवेबाबत काय सांगितलं?
“प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक स्मार्ट आणि वापरण्यास सुलभ सुविधा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. व्हॉट्सअॅप हा सर्वसामान्य वापरात असलेला माध्यम असल्यामुळे तिकीट खरेदीसाठीही तो अत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमाद्वारे एमएमआरसी मुंबईकरांना अधिक सोयीस्कर, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्यास कटिबद्ध आहे,” असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले.
एमएमआरसी आणि PeLocal यांच्या सहकार्याने उपक्रम
“एमएमआरसी आणि PeLocal यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमाचा भाग होण्यास आम्हाला आनंद होत आहे. या सेवेमुळे मेट्रो तिकीट घेणे आता अगदी संदेश पाठवण्याइतके सोपे होईल, ज्यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल,” असे मेटाच्या बिझनेस मेसेजिंग (इंडिया) विभागाचे संचालक रवी गर्ग यांनी सांगितले.
विवेकानंद त्रिपाठी यांनी काय म्हटलं आहे?
“दिल्ली मेट्रो, बस इंडिया, एमएमएमओसीएल, डीटीसी आणि इतर वाहतूक संस्थांसोबत यशस्वीरीत्या ही सेवा राबवल्यानंतर, आम्हाला आता मुंबई मेट्रो मार्ग-३ मध्येही ही सुविधा आणताना अभिमान वाटतो. सार्वजनिक वाहतुकीला डिजिटल माध्यमातून अधिक सुलभ करण्याच्या आमच्या प्रयत्नांना या उपक्रमाने नवा आयाम मिळाला आहे,” असे PeLocal Fintech Pvt. Ltd. चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकानंद त्रिपाठी यांनी सांगितले.
या सेवेद्वारे प्रवासी एका वेळी सहा तिकिटं खरेदी करु शकतात
या सेवेद्वारे प्रवासी एका वेळी सहा QR तिकिट खरेदी करू शकतात. विविध पेमेंट पर्याय उपलब्ध असून, पेपर तिकीटाची आवश्यकता नाही. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देतो. युपीआयद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तर कार्ड पेमेंटसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.