मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

भिवंडीतील २१८ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत येथील ६५ अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात आली आहेत. यासंबंधीच्या प्रस्तावांना एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

भिवंडी आणि आसपासच्या परिसरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत असूनअशा इमारतीत घरे घेणाऱ्या रहिवाशांना फटका बसत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी एमएमआरडीएने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून आपली नियुक्ती असलेल्या क्षेत्रात आवश्यक ती कारवाई सुरू केली आहे.

यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पथकेही तयार करण्यात आली आहेत. ही पथके अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन ती निष्कासनासह नियमितीकरणासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. त्यानुसार भिवंडीतील ६० गावांतील १५८१ अनधिकृत बांधकामांवर नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

नोटीसा बजाविण्यात आलेल्यांपैकी ४६२ अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी एमएमआरडीएने पोलीस बंदोबस्तासाठी मागणी केली आहे. यातील १४९ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन पूर्ण झाले असून ९४ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तर २१८ बांधकामांसाठी पोलीस बंदोबस्त मिळाला असून ही बांधकामे निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी अनधिकृत बांधकाम नियमितीकरण धोरणाअंतर्गत आतापर्यंत ६५ अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्यात आल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.