मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंड सी १३, सी १९ आणि सी ८० या तीन व्यावसायिक भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तिन्ही भूखंडांना चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन भूखंडांसाठी जपानमधील मेसर्स गोईसू रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (सुमीतोमो) कंपनीने बाजी मारली आहे. तर उर्वरित एका भूखंडासाठी मेसर्स श्लाॅस बंगळुरू आणि अर्लिगा इकोस्पेस बिझनेस पार्क (संयुक्त) या कंपनीने बाजी मारली आहे.

आता लवकरच या तिन्ही भूखंडांच्या निविदा अंतिम करत भूखंड विक्रीची प्रक्रिया अंतिम केली जाणार आहे. तर या भूखंड विक्रीतून लवकरच एमएमआरडीएच्या तिजोरीत तब्बल ३८३९ कोटी रुपयांची भर पडणार आहे. दरम्यान याआधीही काही भूखंड जपानमधील सुमीतोमो कंपनीने खरेदी केले आहेत. त्यात आता आणखी दोन भूखंड या कंपनीकडे जाणार आहेत.

एमएमआरडीएकडून ७०७१.९० चौ. मीटरच्या सी १३ , ६०९६.६७ चौ.मीटरच्या सी १९ आणि सी ८० भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएने नुकत्याच आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सी १३ आणि सी १९ भूखंडांसाठी जपानमधील मेसर्स गोईसु रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड (सुमीतोमो) या कंपनीने सर्वाधिक बोली लावत बाजी मारली आहे. सी १३ भूखंडासाठी एमएमआरडीएने ९७४.५१ कोटी रुपये अशी राखीव बोली लावली होती.

सुमीतोमो कंपनीने थेट ४,८०, ९४५ रुपये प्र. चौ. मीटर असे दराने १३६०.४८ कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली आहे. तर सी १९ भूखंडासाठी एमएमआरडीएने ८४०.१२ कोटी रुपये अशी राखीव बोली निश्चित केली होती. त्यानुसार या भूखंडासाठीही मेसर्स गोईसु रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड (सुमीतोमो) या कंपनीने सर्वाधिक ११७७.८६ कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली आहे.

या भूखंडासाठी सुमीतोमोने प्र. चौ.मीटर ४,८२,९९२ रुपये असे दर मोजले आहेत. सुमीतोमोने भूखंड सी १३ भूखंडासाठी एमएमआरडीएच्या राखीव बोलीपेक्षा ३९.६१ टक्के तर सी १९ भूखंडासाठी ४०.२० टक्क्यांनी अधिक किंमत मोजली आहे. सी ८० भूखंडासाठी श्लाॅस बंगळुरू आणि अर्लिगा इकोस्पेस बिझनेस पार्क्स या कंपनीने सर्वाधिक बोली लावत निविदेत बाजी मारल्याची माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली. या कंपनीने एमएमआरडीएच्या राखीव दरापेक्षा अधिक १२.३४ टक्के अधिक दर लावत निविदेत बाजी मारली आहे.

या भूखंडासाठी एमएमआरडीएची राखीव बोली ११५९.१६ कोटी रुपये अशी होती. त्यानुसार या कंपनीने थेट १३०२.१६ कोटी रुपयांची बोली लावली आहे. कंपनीने लावले दर प्रति चौ. मीटर ३,८७,००० रुपये असे आहेत. एकूणच एमएमआरडीएच्या तीन व्यावसायिक भूखंडाला चांगला प्रतिसाद मिळाला असून तिन्ही भूखंड आता प्रत्यक्षात विकले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएमआरडीएकडून आता पुढील प्रक्रिया पूर्ण करत भूखंडाची रक्कम भरुन घेत भूखंडाचा ताबा येत्या काही महिन्यात बोलीत बाजी मारणार्या कंपन्यांना दिला जाईल. तर त्याचवेळी या तीन भूखंडाच्या विक्रीतून एमएमआरडीएच्या तिजोरीत ३८३९ कोटी रुपयांची भर पडणार आहे. तर या महसुलामुळे मेट्रोसह इतर प्रकल्प मार्गी लावण्यास एमएमआरडीएस मदत होणार आहे.