मुंबई : ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेच्या कामादरम्यान कंत्राटदार जे. कुमार कंपनीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली असून यासंबंधीची लेखी तक्रारही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) प्राप्त झाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत अखेर एमएमआरडीएने जे. कुमार कंपनीला पाच लाख रुपये दंड ठोठावला. ‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कामादरम्यान सप्टेंबरमध्ये ३० किलोचा हायड्राॅलिक जॅक पडल्याप्रकरणी याच कंपनीला एमएमआरडीएने १० लाख रुपये दंड केला होता. तर मागील काही महिन्यात मेट्रोसह इतर प्रकल्पांमध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवत या कंपनीला सहा कोटी रुपयांहून अधिक दंड करण्यात आला आहे.

एमएमआरडीएकडून ‘मेट्रो ९’ मार्गिकेचे काम करण्यात येत असून या मार्गिकेचे काम जे. कुमार कंपनीला देण्यात आले आहे. ‘मेट्रो ९’ मार्गिकेअंतर्गत मिरा-भाईंदर येथे एमएमआरडीएने एक दुमजली पूल बांधला आहे. या पुलाचे लोकार्पण होऊन एक वर्ष होत नाही तोच पुलाची दुरवस्था झाली असून पुलावर खड्डे पडले आहेत. तर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली या कंत्राटदाराने मलमपट्टी केल्याने भरलेले खड्डेही महिन्याभरात उखडले. याप्रकरणी स्थानिकांनी एमएमआरडीएकडे लेखी तक्रार देऊनही कंपनीविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई वा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आता ‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कामादरम्यान भाईंदर पूर्व मेडतीया नगर येथे वेल्डींग करत असताना कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत काम सुरू असल्याचेही समोर आले आहे.

वेल्डींगदरम्यान आगीच्या ठिगण्या खालून जाणाऱ्या वाहनांवर पडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंबंधी ॲड. कृष्णा गुप्ता यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला होता आणि यासंबंधीची लेखी तक्रार एमएमआरडीएकडे केली होती. याची दखल घेत अखेर एमएमआरडीएने जे. कुमारला पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे. एमएमआरडीएने एक्सवरून (ट्विटर) ही माहिती दिली आहे.

‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कामादरम्यान ४ डिसेंबर २०२४ रोजी एक आरएमसी मिक्सर खड्ड्यात पडला आणि त्यात चालक मृत्युमुखी पडला होता. दरम्यान, ‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कामादरम्यान जे. कुमार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेल्याची माहिती एमएमआरडीएकडून माहिती अधिकाराखाली देण्यात आली आहे. त्याचवेळी ‘मेट्रो ३’ (कफ परेड-आरे) मार्गिकेच्या चाचण्यांच्यादरम्यान स्थानकात पाणी शिरल्याप्रकरणी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) या कंपनीला दोन कोटी रुपये दंड केला होता. तर ‘मेट्रो २ ब’ (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकेच्या कामादरम्यान पियर आणि पियर कॅप्सचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल एमएमआरडीएने ४६ लाख रुपये दंड ठोठावला होता.

मागील काही महिन्यातच सहा कोटी रुपयांहून अधिक दंड या कंपनीला करण्यात आला आहे. मात्र या कंपनीविरोधात कोणतीही ठोस, गुन्हा दाखल करण्याची वा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का होत नाही, असा प्रश्न ॲड. गुप्ता यांनी उपस्थित केला आहे.