मुंबई : मुंबई – नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवी मुंबईच्या दिशेने रस्त्याची लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यातच दूरवस्था झाली आहे, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आदेशानुसार कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची पाच दिवसांत दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदाराला दिले. तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचे काम हाती घेण्याचेही आदेश कंत्राटदारास यावेळी देण्यात आले.

अटल सेतू जानेवारी २०२४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक सेवेत झाल्यानंतर अवघे काही महिने लोटताच अटल सेतूची काही ठिकाणी दूरवस्था झाली आहे, पृष्ठभागाची झीज होऊन खड्डे पडले आहेत. अल्पावधीतच खड्डे पडल्याने आता अटल सेतूच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अल्पावधीतच अटल सेतूवर खड्डे पडले असून रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर शुक्रवारी विक्रम कुमार यांनी अटल सेतूवरील खड्डे पडलेल्या रस्त्याची पाहणी केली.

अटल सेतुवरील खड्डेप्रकरणी एमएमआरडीएकडून देवू-टाटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स या कंत्राटदार कंपनीला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे. तर दोष दायित्व कालावधीही एक वर्षाने वाढविण्यात आला आहे. आता शुक्रवारी विक्रम कुमार यांनी पाच दिवसात प्रभावित रस्त्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. या वेळेत काम पूर्ण न झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी कंत्राटदाराला दिला. तसेच पावसाळा संपल्यानंतर रस्त्याची व्यापक दुरूस्ती कंत्राटदाराच्या खर्चाने करून घेतली जाणार आहे. डेंस बिट्युमिनस मॅकॅडम आणि ॲस्फाल्ट काँक्रीटचा वापर करून ही दुरुस्ती केली जाणार आहे.

दरम्यान, अतिवृष्टी आणि अविरत धावणारी वाहने यामुळे अटल सेतूची दूरवस्था झाल्याचा पुनरुच्चार एमएमआरडीएने केला आहे. सागरी सेतू हा अविरत वाहने धावण्यासाठीच बनविला आहे, तर जागतिक दर्जाच्या सेतूचे काम जागतिक दर्जाचेच असायला हवे, असा मुद्दा उपस्थित करून वाहतूक तज्ज्ञांनी एमएमआरडीएच्या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त केले. प्रभावित रस्त्याची योग्य ती दुरुस्ती तातडीने करून घ्यावी अन्यथा अपघाताची भीती वाहतूक तज्ज्ञ विवेक पै यांनी व्यक्त केली आहे.