मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करून भविष्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३३७ किमीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात १४ मेट्रो मार्गिका असून यातील मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ(दहिसर ते अंधेरी पश्चिम), मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) आणि मेट्रो ३ (आरे ते आचार्य अत्रे चौक) मार्गिका सेवेत दाखल आहेत. तर सध्या कामे सुरु असलेल्या मेट्रो २ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले), मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण), मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), मेट्रो ७ अ (गुंदवली ते मुंबई विमानतळ), मेट्रो४-४ अ(वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमूख) आणि मेट्रो ९ (दहिसर-मिरा-भाईंदर) मार्गिका पूर्ण क्षमतेने २०२७ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान मार्गिकांची कामे सुरु झाल्यापासून पाच वर्षात मार्गिकांची कामे सुरु होणे अपेक्षित होते. मात्र कामास विलंब झाल्याने सर्वच मार्गिका वाहतूक सेवेत विलंबाने दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील पहिल्या मेट्रो १ मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) २००८ मध्ये हाती घेण्यात आले होते. केवळ ११.४ किमीची ही मार्गिका पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. जून २०१४ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल झाली. मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी या मेट्रोची ओळख झाली. मेट्रो १ चे काम सुरु होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होईपर्यंत पुढील मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या कामास सुरुवात करण्यासाठी २०१६ उजाडले. तर मेट्रो ३ च्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली असून मेट्रो ४चे काम २०१८ आणि ४ अचे काम २०१९ मध्ये सुरु झाले. मेट्रो ६ च्या कामालाही २०१७ मध्ये सुरुवात झाली. मेट्रो ९ चे २०१९ मध्ये तर मेट्रो ५ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या कामाला २०२० मध्ये सुरुवात झाली आहे. मेट्रो २ब चे कामही २०१८ मध्ये सुरु झाले. काम सुरु झाल्यापासून पाच वर्षात या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र या सर्व मार्गिकांच्या कामास तांत्रिक आणि इतर कारणांमुळे विलंब झाला आहे. परिणामी एमएमआरमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यासही विलंब झाला आहे. २०१६ मध्ये काम सुरु झालेल्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी २०२२ तर दुसरा टप्पा (पूर्ण क्षमतेने) जानेवारी २०२३ उजाडले. जवळपास सात वर्षे या मार्गिकांच्या पूर्णत्वासाठी लागले.

मेट्रो १,२ अ आणि ७ नंतर मुंबईत धावणारी चौथी मार्गिका ठरली ती मेट्रो ३ मार्गिका. या मार्गिकेचे २०१६ मध्ये सुरु झाले. ही मार्गिकाही पुढील पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असताना ही मार्गिका पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) मार्गिका टप्प्याटप्प्यात सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ ला, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ ला आणि आता शेवटचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्पा बुधवारी सेवेत दाखल होणार आहे. म्हणजेच ही मार्गिकेचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला आहे. चार मेट्रो मार्गिका कार्यान्वित असताना २०१६ ते २०२० दरम्यान कामास सुरुवात झालेल्या मार्गिकांची १०० टक्के कामे पूर्ण होण्यास २०२७-२०२८ उजाडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुरू प्रकल्प कधी पूर्ण होणार

मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्प्यासाठी तसेच मेट्रो ४ ,४ मधील गायमूख ते विजय गार्डन टप्प्यासाठी एमएमआरडीएने डिसेंबरचा मुहुर्त दिला आहे. त्याचवेळी मेट्रो ६ चे कामही २०२७ पर्यंत पूर्ण होऊन हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो ५ चा पहिला टप्पाही २०२७ मध्येच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. तसेच मेट्रो ७ अ चे कामासाठी २०२७ चा मुहूर्त आहे. त्यामुळे २०२७ मध्ये मेट्रो २ब, ४, ४ अ, मेट्रो ६, ७ अ आणि ९ या मार्गिका पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो ५ चा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मेट्रो १२ च्या कामास गेल्यावर्षी सुरुवात करण्यात आली असून लवकरच उर्वरित मेट्रो १०,१४ आणि १४ मार्गिकांच्या कामासही सुरुवात होणार आहे. एमएमआरसीकडून मेट्रो ११ (आणिक आगार ते गेटवे) च्या कामास सुरुवात केली जाणार असून मेट्रो ८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेचे काम सार्वजनिक-खासगी सहभागातून केले जाणार असून नोडल एजन्सी म्हणून सर्व जबाबदारी सिडको आहे. तेव्हा या सर्व मार्गिकांची कामे पूर्ण होण्यास २०३१-३२ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व १४ मेट्रो मार्गिका पूर्ण होण्यास, ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे पूर्ण होण्यास २०३१-३२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सध्या सुरु असलेल्या मार्गिकांच्या कामाच्या पूर्णत्वाची टक्केवारी अशी:

मेट्रो ४ (वडाळा–कसारवडवली): ८६% पूर्ण

मेट्रो ४ अ (कसारवडवली–गायमुख): ९५% पूर्ण

मेट्रो ५ (१) (ठाणे–भिवंडी): ९६% पूर्ण

मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर–विक्रोळी): ८०% पूर्ण

मेट्रो ९ (दहिसर–मीरा-भाईंदर): ९८% पूर्ण

मेट्रो ७ अ (अंधेरी ईस्ट–मुंबई विमानतळ): ६२% पूर्ण

मेट्रो १२ (कल्याण–तळोजा): १२% पूर्ण