मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकिट प्रणाली योजनेअंतर्गत मुंबई वन ॲप कार्यान्वित केला आहे. या ॲपद्वारे मेट्रो, रेल्वे, बेस्ट बस, मुंबई महानगर प्रदेशातील बस सेवा यासाठी ई तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. एकाच ॲपवरून सामायिक तिकिट काढून प्रवास करणे प्रवाशांना सोयीचे झाले असतानाच आता एमएमआरडीएने प्रवाशांना आणखी एक दिलासा दिला आहे. मुंबई वन ॲपवरून भीम यूपीआयचा वापर करून किमान २० रुपयांचे तिकिट काढल्यास त्यावर २० टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे.
एमएमआरमधील प्रवासी पाच महापालिकांच्या बस सेवेसह रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनोरेलमधून प्रवास करतात. अशावेळी प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकिट खरेदी करावे लागते. यात वेळ जातो, रांगेत उभे रहावे लागते. ही बाब लक्षात घेता एकाच तिकिटाद्वारे सर्वच यंत्रणांच्या सार्वजनिक वाहनांतून प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी एकात्मिक तिकिट प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर अनेक वर्षांपासून एमएमआरडीए काम करीत होते, मात्र अखेर ऑक्टोबरमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई वन ॲपद्वारे एमएमआरडीएने एकाच तिकिटावर मोनोरेल, मेट्रो, रेल्वे, बस आणि पाच महापालिकांतील बस सेवेतून प्रवास करण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. सामायिक तिकिटाद्वारे प्रवास करणे सुकर झाले आहे. आता मुंबई वन ॲपवरून भीम यूपीआयचा वापर करत सामायिक तिकिट खरेदी केल्यास २० टक्के सवलतीची योजना एमएमआरडीएने सुरू केली आहे.
भीम यूपीआयचा वापर करून किमान २० रुपयांचे सामायिक तिकिट खरेदी केल्यास त्यावर २० टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच रेल्वे, मेट्राे, बेस्ट आणि एमएमआरमधील पाच महापालिकांतील बसच्या तिकिटावर ही सवलत मिळणार आहे. तर महिनाभरात कमाल सहा व्यवहारांवर ही सवलत असणार हे महत्त्वाचे. ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. या सुविधेचा वापर अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई वन ॲपविषयी प्रवाशांच्या कोणत्याही तक्रारी, प्रश्न वा समस्या असतील तर त्या त्यांना मदत क्रमांक १८००-२६८-४२४२ वर संपर्क साधून सोडविता येतील.
