मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुंबई मनहागर प्रदेशातील १४ मेट्रो मार्गिकावरील ३४ मेट्रो स्थानके आणि मध्य, पश्चिम रेल्वेवरील ३९ रेल्वे स्थानके लवकर एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानक पूल, पादचारी मार्ग आणि भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे आणि मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणे सुलभ होणार आहे. रेल्वे आणि मेट्रो स्थानके जोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष समिती लवकरच ३४ मेट्रो स्थानके आणि ३९ रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण करणार आहे.

‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेपासून ‘कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४’पर्यंतच्या मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे. तर ठाणे रिंग मेट्रो मार्गिकेतील स्थानके ठाणे रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येणार आहेत. या समितीत मध्य आणि पश्चिम रेल्वे, एमआरव्हीसी, एमएमआरडीए, सिडको, महामेट्रो आदी यंत्रणातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संदर्भातील समन्वय आणि प्रतिनिधित्वाची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. या समितीच्या माध्यमातून रेल्वे आणि मेट्रो स्थानके जोडण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. लवकरच या समितीची बैठक होणार असून या कामास गती दिली जाणार आहे.

ही स्थानके जोडली जाणार

मेट्रो १ – अंधेरी मेट्रो स्थानक अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाशी, तर घाटकोपर मेट्रो स्थानक घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडण्यात येणार.

मेट्रो २ ब – कुर्ला पूर्व मेट्रो स्थानक टिळक नगर, एलटीटी आणि कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाशी एकत्रित (काॅमन) पादचारी पुलाने जोडणार.

मेट्रो ३ – चर्चगेट मेट्रो स्थानक चर्चगेट रेल्वे स्थानकाशी, सीएसएमटी मेट्रो स्थानक सीएसएमटी रेल्वे स्थानकाशी, ग्रॅन्ट रोड मेट्रो स्थानक ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाशी तर मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाशी भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहे. तर महालक्ष्मी मेट्रो स्थानक आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानक पादचारी पुलाने जोडण्याबरोबरच मोनोरेल मार्गिकेतील संत गाडगे महाराज चौक स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे. दादर मेट्रो स्थानक आणि दादर रेल्वे स्थानक पादचारी पुलाने, शितला देवी मेट्रो स्थानक आणि माहीम रेल्वे स्थानक भुयारी मार्गाने, सांताक्रुझ मेट्रो स्थानक आणि सांताक्रुझ पूर्व रेल्वे स्थानक पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

मेट्रो ४ – पंतनगर मेट्रो स्थानक घाटकोप पूर्व रेल्वे स्थानकाशी, विक्रोळी मेट्रो स्थानक विक्रोळी पूर्व रेल्वे स्थानकाशी, भांडूप मेट्रो स्थानक भांडूप पूर्व रेल्वे स्थानकाशी, तर तीन हात नाका मेट्रो स्थानक नवीन ठाणे रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

मेट्रो ५ – अंजूरफाटा मेट्रो स्थानक भिवंडी रोड रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहेत.

मेट्रो ६ – जोगेश्वरील पूर्व मेट्रो स्थानक जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्थानकाशी आणि विक्रोळी मेट्रो स्थानक कांजूरमार्ग पश्चिम रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहे.

मेट्रो ७ – गोरेगाव पूर्व मेट्रो स्थानक राम मंदिर पूर्व रेल्वे स्थानकाशी, तर राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानक बोरिवली पूर्व रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहे.

मेट्रो ८ – मानखुर्द मेट्रो स्थानक मानखुर्द रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

मेट्रो ११ – सीएसएमटी मेट्रो स्थानक सीएसएमटी रेल्वे स्थानकाशी, शिवडी मेट्रो स्थानक शिवडी रेल्वे स्थानकाशी, तर भायखळा मेट्रो स्थानक भायखळा रेल्वे स्थानकाशी जोडले जाणार आहे. मात्र कोणत्या पर्यायाने ते अद्याप निश्चित नाही.

मेट्रो १२ – कल्याण मेट्रो स्थानक कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

मेट्रो १३ – नायगाव मेट्रो स्थानक नायगाव रेल्वे स्थानकाशी, तर नालासोपारा मेट्रो स्थानक नालासोपारा रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

मेट्रो १४ – कांजूरमार्ग मेट्रो स्थानक कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाशी, घनसोली मेट्रो स्थानक घनसोली रेल्वे स्थानकाशी, बदलापूर मेट्रो स्थानक बदलापूर पूर्व रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे.

मेट्रो १५ – ठाणे मेट्रो स्थानक ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाशी, नवीन ठाणे रेल्वे मेट्रो स्थानक नवीन ठाणे रेल्वे स्थानकाशी भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहे.