मुंबई : ठाणे -बोरिवली भूमिगत मार्गासाठी १६ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा निधी उभारण्याचे मोठे आव्हान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) पेलावे लागणार आहे. त्यामुळेच कर्ज उभारणीसाठी आर्थिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा मागवल्या आहेत.

‘एमएमआरडीए’ने ठाणे – बोरिवलीदरम्यान ११.८ किमी लांबीच्या भूमिगत मार्गाची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ११, २३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पण, ‘एमएमआरडीए’ने तयार केलेल्या सुधारित आराखडय़ानुसार प्रकल्पाचा खर्च १६ हजार ६०० कोटी रुपयांवर गेला आहे. आधीच्या आराखडय़ात केवळ दोन बोगद्यांच्या कामाचा समावेश होता. यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने सुधारित आराखडा तयार केला आहे.

या आराखडय़ानुसार बोगद्याकडे जाणे-येणे सोपे व्हावे, यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रस्त्यावर अंदाजे ७०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. येथेच अंदाजे ५०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग, तसेच बोरिवलीच्या दिशेने ८५० मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली. तसेच उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधतानाच बोगद्यात अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, विद्युत यंत्रणा, तसेच ‘ओपन रोड टोलिंग’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच दुहेरी बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज असतील. त्यामुळेही प्रकल्पाचा खर्च वाढला आहे.

या प्रकल्पासाठी १६ हजार ६०० कोटी रुपये निधी उभारणे आवश्यक आहे. हा निधी कर्ज रूपाने उभारण्यासाठी आर्थिक सल्लागराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. आर्थिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केली आहे. लवकरच आर्थिक सल्लागार नेमून कर्ज उभारणी कशी करायची आणि पुढे कर्जाची परतफेड कशी करायची हे निश्चित करण्यात येणार आहे.

पावसाळय़ानंतर कामाला सुरुवात..

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गासाठी ‘एमएमआरडीए’ने मेघा इंजिनीयिरग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. आता कार्यादेश देतानाच इतर प्रक्रिया पूर्ण करून पावसाळय़ानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.