मुंबई : येत्या काही वर्षांत मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार असून या मार्गिकेचे शेवटचे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल येथे बांधण्यात येत आहे. बुलेट ट्रेन धावू लागल्यानंतर बीकेसीतील वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे. अशावेळी वाहने उभी करण्यासाठी भुयारी बुलेट ट्रेन स्थानकाच्या आसपास कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनतळाचा प्रश्न उद््भवण्याची आणि त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेऊन विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भुयारी बुलेट ट्रेन स्थानकावर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. यासाठीचा सविस्तर आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे.
अहमदाबाद – मुंबई प्रवास ९ तासांऐवजी दोन – अडीच तासात करता यावा यासाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल)कडून ५०८ किमी लांबीच्या मुंबईत – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील शेवटचे स्थानक बीकेसीत असून हे स्थानक भुयारी आहे. दरम्यान, हे स्थानक २०२८-२०२९ दरम्यान वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हे स्थानक सुरू झाल्यास बीकेसीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. असे असताना बुलेट ट्रेन प्रकल्पात वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अर्थात स्थानकानजीक वाहनतळाची कोणतीही व्यवस्था अंतर्भूत नाही. त्यामळे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची चिंता वाढली आहे.
मुळात बीकेसीत वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना पुढे वाहनांची, लोकांची संख्या वाढल्यास वाहतूक कोंडी आणखी वाढणार आहे. त्याचवेळी वाहने कुठे उभी करायची हा प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे अखेर एमएमआरडीएनेच पुढाकार घेऊन भुयारी बुलेट ट्रेन स्थानकावर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
भुयारी बुलेट ट्रेन स्थानकावर बहुमजली वाहनतळाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतरच हे वाहनतळ किती मजली असेल, त्यासाठी किती खर्च येईल, त्यात किती वाहने उभी करता येईल हे स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर रिक्षा, दुचाकी. चार चाकी, बस अशी सर्व प्रकारची वाहने या वाहनतळात उभी करता येतील यादृष्टीने त्याची रचना असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.