मुंबई : उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १’ ॲप तयार करीत आहे. या कार्ड आणि ॲपचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच ‘मुंबई १ कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’चे लोकार्पण करून ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
एमएमआरमधील प्रवासी विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. यात उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मेट्रो यांचा समावेश आहे. या प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट खरेदी करावे लागते. यात प्रवाशांचा वेळ जातो आणि त्यांना त्रासही होतो. ही बाब लक्षात घेऊन वेगवेगळी तिकीटे खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्यात येणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
‘मुंबई १ कार्ड’ बेस्ट, रेल्वे, मोनो, मेट्रो आणि एमएमआरमधील स्थानिक सार्वजनिक वाहतुकीसाठीही वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले होते. एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत एमएमआरमधील सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता येईल असे ‘मुंबई १ कार्ड’ तयार करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवण्यात आली होती. एमएमआरडीए हे कार्ड तयार करीत असून हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एमएमआरडीएच्या ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई १ कार्ड’मध्येच बदल करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत या कार्डचे लोकार्पण करण्याचे राज्य सरकार आणि एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे कार्ड ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’, ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’, ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’, मोनो रेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वे प्रवासासाठीही चालणार आहे.
या कार्डवरून सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचे तिकीट उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार आता हे कार्ड एसटी सेवेशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे एमएमआरमधील प्रवासी या कार्डवरून एसटीतूनही प्रवास करू शकणार आहेत. ‘मुंबई १ कार्ड’सह ‘मुंबई १’ ॲपही असणार आहे. त्यामुळे या ॲपवर तिकीट उपलब्ध होणार आहे.