मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता विकासक म्हणून काम करणार आहे. घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीतील १६,५७५ झोपडय़ांचे पुनर्वसन एमएमआरडीए करणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए प्रथमच संयुक्तपणे हा प्रकल्प राबविणार आहे.

या प्रकल्पातून एमएमआरडीएला अतिरिक्त सुमारे पाच हजार घरे उपलब्ध  होणार आहेत. ही घरे प्रकल्पबाधितांना देण्याची किंवा बाजारभावाने विकण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नागपूर येथे झालेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सदर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सुनावणी होत नसल्याने याचिकाकर्त्यांचा न्यायमूर्ती पटेल यांना ई-मेल; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरे थेट जोडण्यासाठी १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधण्यात आला. पी. डीमेलो मार्ग – चेंबूरदरम्यानच्या या पूर्वमुक्त मार्गामुळे २०१३ पासून प्रवास वेगवान झाला आहे. पी. डीमेलो मार्गावरून वेगात चेंबूरला पोहोचल्यानंतर पुढे ठाण्याला जाण्यासाठी वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पूर्वमुक्त मार्गाचा छेडानगर – आनंदनगर, ठाणे दरम्यान विस्तार करण्यात येत आहे. सहा मार्गिकेच्या १३ किमीच्या या विस्तारीकरणासाठीची कार्यवाही एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यानुसार लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबडेकर नगर झोपडपट्टीतील बहुसंख्य झोपडय़ा बाधित होणार आहेत. तसेच एमएमआरडीएला मोठय़ा प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएमध्ये चर्चा झाली, बैठका झाल्या आणि अखेर रमाबाई आंबेडकर नगरातील झोपडय़ांच्या पुनर्वसनाची जबाबदारी एमएमआरडीएने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच हजार अतिरिक्त घरे

रमाबाई आंबेडकर नगरातील झोपडय़ांच्या पुनर्वसनासंबंधीच्या प्रस्तावानुसार एमएमआरडीए विकासक म्हणून काम पाहणार आहे. झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागिदारी प्रकल्प योजनेद्वारे येथील झोपडय़ांचे पुनर्वसन करणार आहे. रमाबाई आंबेडकर नगरातील १६ हजार ५७५ झोपडय़ाचे याच परिसरात पुनर्वसन करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून एमएमआरडीएला पाच हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी या घरांचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या घरांची  बाजारभावाने विक्री करण्याचा पर्याय चर्चेत आहे. बाजाभावाने ही घरे विकल्यास एमएमआरडीएला १०७३.३८ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. यातील कोणता पर्याय निवडायचा हे निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.