मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पाचा भू-तांत्रिक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून सल्लागाराच्या नियुक्तीसाठी नुकतीच निविदा जारी करण्यात आली आहे.
वर्सोवा – विरार अंतर कमी करण्यासाठी, तसेच प्रवास ४० ते ४५ मिनिटांत करता यावा आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र आर्थिक कारणामुळे एमएसआरडीसीला हा प्रकल्प मार्गी लावता आला नाही. अखेर सरकारने हा प्रकल्प एमएमआरडीएकडे सोपविला. एमएमआरडीएने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावले उलचण्यास सुरुवात केली आहे. प्राधिकरणाच्या मार्चमधील १५४ व्या बैठकीत या प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासाच्या प्रस्तावास आणि प्रकल्पाचा विस्तार पालघरपर्यंत करण्यास हिरवा कंदिल दिला. आता एमएमआरडीएने सागरी सेतूचा भू-तांत्रिक अभ्यास करण्यासाठी निविदा जारी केल्या आहेत.
हेही वाचा >>>मुंबईतल्या व्यावसायिकाच्या पत्नीची अभिनेता साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार
प्रकल्पाचा भू-तांत्रिक अभ्यास हा महत्त्वाचा भाग असतो. या अभ्यासानुसार प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला जातो. वर्सोवा – विरारदरम्यान समुद्राखाली किती दगड आणि माती आहे. किती खोल पाया करावा लागेल अशा अनेक बाबींचा भू-तांत्रिक अभ्यासात समावेश आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी सेतूचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी आणखी एक -ते दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे.