मुंबई : ‘माझ्या चित्रपटासाठी मलाच आंदोलन करणे पटत नाही. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषा, तसेच मराठी चित्रपट विविध चित्रपटगृहात झळकण्यासाठी आंदोलन करीत आलो आहोत. या आंदोलनानंतर मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये झळकले. त्यामुळे हा माझ्यावर मल्टिप्लेक्सवाल्यांनी राग काढला आहे. पण इथून पुढे मराठीची गळचेपी करून मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लावले नाहीत, तर मी नक्की बदला घेणार, थेट काचाच फुटतील’, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष व निर्माते अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला आहे.

‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’च्या यशानंतर संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट १८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचदिवशी ‘सैय्यारा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र एका आठवड्यानंतर ‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट अनेक ठिकाणच्या बहुपडदा चित्रपटगृहातून (मल्टिप्लेक्स) संपूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेय खोपकर यांनी संतप्त भूमिका घेतली आहे.

माझ्या चित्रपटासाठी मलाच आंदोलन करणे पटत नाही, मात्र मराठीची गळचेपी करून मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लागत नसतील तर थेट काचाच फुटतील, असा इशारा त्यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला आहे. तसेच मी आजवर ज्यांच्यासाठी उभा राहिलो आणि अंगावर केसेस घेतल्या, त्या मनोरंजनसृष्टीतील एकही माणूस पुढे येऊन बोलत नाही.

या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटते, अशी खंतही खोपकर यांनी व्यक्त केली. तर संजय राऊतांनीही पक्ष न बघता ट्विट केले. सुशांत शेलारांनीही पाठराखण केली. मराठी भाषा, मराठी चित्रपट आणि एकूणच मराठी मनोरंजनक्षेत्रातील विविध मंडळी, मनसेसह इतर राजकीय पक्ष एकवटले आहेत, त्यांचे आभारही खोपकर यांनी पत्रकार परिषदेत मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अनेक कलाकार व तंत्रज्ञांनी ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे चित्रपट चालणार की नाही? हे एका आठवड्यात कसे ठरवता? मराठी चित्रपटांना डावलून हिंदीला कसे काय प्राधान्य दिले जाते ? दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्लाझा चित्रपटगृहात एकही शो मराठी चित्रपटाला देण्यात आलेला नाही, सर्वच्या सर्व ४ शो ‘सैय्यारा’ या हिंदी चित्रपटाला देण्यात आले आहेत. तुम्हाला अमेय खोपकरवर राग आहे, तर अमेय खोपकरचा चित्रपट लावू नका. पण बाकीचे मराठी चित्रपट तरी मल्टिप्लेक्समध्ये दाखवा. महाराष्ट्रातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आम्ही सरकार दरबारी जाणार नाही, सरकारने मराठी चित्रपट व निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे’, असे स्पष्ट मत अमेय खोपकर यांनी स्पष्टपणे व्यक्त केले.