मुंबई: गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्रासाठी चांगले नाही. सध्याचे शिंदे-फडणवीसांचे सरकार हा सत्तेचा तात्पुरता आर्थिक समझोता असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली.

मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी शिवसेनेवरही  टीकास्त्र सोडले. तसेच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मनसेने कोणतेही आंदोलन अर्धवट सोडले नाही. आपल्या आंदोलनामुळे राज्यातील ६५ टोलनाके बंद झाले. टोलचा पैसा सगळय़ा पक्षांकडे जातो, असा आरोप करतानाच टोलमुक्त महाराष्ट्रचे आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत असताना त्याची पूर्तता का केली नाही याबद्दल त्यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या आंदोलनामुळेच ९२ टक्के मशिदीवरील भोंगे बंद झाले असून मुस्लिमांकडूनही या आंदोलनाचे स्वागत करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी या वेळी केला.

छगन भुजबळ, नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामील झाले. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून पक्षातून बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आपल्याकडे वास्तू नसली तरी विचारांचा वारसा आहे. बाळासाहेबांचे विचार आहेत असे नमूद केले.

पदाधिकाऱ्यांना इशारा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर कमेंट करून काढला तर त्याला क्षणभरही पक्षात ठेवणार नाही. तुम्ही प्रमुख पदांवर असाल तर त्या पदाची शान राखली पाहिजे. पक्षाने ज्या पदावर तुमची नेमणूक केली आहे, त्याचा आदर केला पाहिजे. बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये होणारा धुडगूस चालू असेल तो चालू दे. मी आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिला.