लोकसभा निवडणुकीत सेनेने केलेल्या विखारी अपप्रचारास प्रत्युत्तर म्हणून मनसेतर्फे प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या सदस्यांच्या मदतीने शिवसेनेने बाजी मारली. एका रात्रीत फार मोठा घोडेबाजार भरविला जाऊन सेनेच्या दीपेश म्हात्रे यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली.
महापालिकेत स्थायी समितीचे एकूण १६ सदस्य आहेत. सेनेचे चार, दोन अपक्ष, भाजपचे एक अशी सात मते युतीकडे होती. मनसे चार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी दोन तर एक राष्ट्रवादी समर्थक अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. त्यातील भाजप नगरसेविका अर्चना कोठावदे निवडणुकीच्या दोन दिवस आधीच गायब झाल्या. तरीही स्थायी समिती सभापतीपदासाठी मंगळवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना शिवसेनेची चार, दोन अपक्ष, एक राष्ट्रवादी समर्थक अपक्ष नगरसेविका उषा वाळंज अशी ७ मते मिळाली. मनेसेचे उमेदवार राजन मराठे यांना फक्त स्वपक्षाची ४ मते मिळाली. काँग्रेसचे जितेंद्र भोईर यांनीही सभापतीपदाचा अर्ज भरला होता. मात्र त्यांच्या पक्षाचा दुसरा सदस्य एम. साबीर कुरेशी गैरहजर राहिल्याने त्यांनी तटस्थ राहणे पसंत केले. राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे आणि जव्वाद डोन हे दोघे गैरहजर होते.
भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी तटस्थतेची भूमिका घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला मत देणे टाळले. अशा रीतीने मनसेच्या तज्ज्ञांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना हाताशी धरून मांडलेले विजयाचे गणित एका रात्रीत मोडून काढण्यात शिवसेना नेते यशस्वी झाले. ठाण्यात सभापतीपद मिळविण्यासाठी काँग्रेस आघाडीने सहकार्य केले. तशीच मदत येथेही मिळण्याची अपेक्षा मनसे बाळगून होती, मात्र ती फोल ठरली.
निवडणुकीनंतर कोठावदे यांना मनसेच्या नगरसेविकांनी बंदोबस्तात मनसेच्या दालनात नेले. कोठावदे या खडसे समर्थक असल्याने सकाळपासून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे कोठावदे यांची समजूत काढण्यासाठी पालिकेत हजर  होते. कोठावदे मनसेच्या कोठडीत असल्याने खडसेंना त्या भेटू शकल्या नाहीत.

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

राष्ट्रवादीचे दोघे निलंबित
सभापतीपद निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी अनुपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या विकास म्हात्रे आणि जव्वाद डोन या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पक्षादेशांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

कोठावदेंवर कारवाई
या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करावे म्हणून काढलेला पक्षादेश भाजप नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी स्वीकारला नाही. पक्ष उमेदवाराला मतदान केले नाही. पक्षादेश फाडून टाकण्यात आला. त्यामुळे अर्चना कोठावदे यांना भाजपकडून नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

घोडेबाजाराचा इन्कार
शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच मनसेचे सुधीर जाधव या दोघांनीही स्थायी समिती निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.