मुंबई: सांताक्रुझ येथील अनेक भागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून दूषित तसेच अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात दोन वेळा मोर्चा काढण्यात आला. मात्र, अद्याप त्यावर पालिकेने तोडगा काढलेला नाही. परिणामी, पालिकेच्या विभाग कार्यालयात दहा हजार उंदीर आणि घुशी सोडण्यात येतील, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कलिना विधानसभा मतदार संघातील वाॅर्ड क्रमांक ८९ विभागातील नागरिकांना सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागरिकांनी दोन वेळा पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान या समस्येवर काही दिवसातच तोडगा काढण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने नागरिकांना दिले. मात्र, सात – आठ महिने उलटूनही या भागात पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मनसेच्यावतीने पालिकेच्या एच. पूर्व विभाग कार्यालयात दहा हजार उंदीर आणि घुशी सोडण्यात येतील, असे मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. परिसरातील गावदेवी, मिलिंद नगर, वाघरीवाडा, लालबहादूर शास्रीनगर, सुब्रमण्यमनगर, डिमेलो कंपाऊंड व नवजीवन आदीं परिसरातील नागरिक अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे हैराण झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

यापूर्वी दोन वेळा पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पाण्याच्या समस्येची दखल घेऊन तत्काळ त्यावर तोडगा काढला जाईल, असे लेखी स्वरूपात पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, सात ते आठ महिने उलटूनही पालिकेने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत, असा आरोप मनसे शाखा अध्यक्ष संतोष उपरलकर यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.