Amit Thackeray: मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांनी आज सकाळी भाजपाचे नेते, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मुंबईतील वाहतूक समस्येबाबत प्रश्न मांडला होता. तसेच हा प्रश्न सोडविण्यासंबंधीचे सादरीकरणही केले होते. त्यानंतर आज आशिष शेलार यांनी घेतलेली शेलार यांची भेट चर्चेत आहे.

आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष असून मुंबईचे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवू शकतो. अशावेळी अमित ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीबद्दल उत्सुकता निर्माण झाली. या भेटीदरम्यान काही वेळी दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र चर्चा केल्याचेही वृत्तवाहिन्यांनी दाखवले.

सदर भेटीनंतर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भेटीमागील कारण स्पष्ट केले. तसेच स्वतंत्र चर्चा करण्याच्या प्रश्नावरही उत्तर दिले.

अमित ठाकरे म्हणाले, २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मंत्री आशिष शेलार यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. पण याच महोत्सव काळात मुंबईत काही महाविद्यालये आणि खासगी शाळांमध्ये परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नाही.

गणेशोत्सवानिमित्त अनेक लोक आपल्या मूळ गावी जातात. आई-वडील गावाला गेल्यावर जर विद्यार्थी मुंबईत परीक्षेसाठी थांबले तर कुठेतरी कौटुंबिक तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. यामुळे राज्य सरकारने या काळातील परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी आशिष शेलार यांच्याकडे केल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

अमित ठाकरे यांनी केलेल्या मागणी संदर्भात मुख्य सचिवांशी चर्चा करून, संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश दिले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना सणाचा आनंद उपभोगता यावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

शिक्षण मंत्र्यांना निवेदन का नाही?

सदर प्रश्न शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांना याबाबत निवेदन का नाही दिले? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरे म्हणाले, वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा आम्ही आशिष शेलार यांनाच भेटलो. त्यांनीच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता. त्यामुळे आम्ही शेलार यांची भेट घेतली.

स्वतंत्र चर्चेचे कारण…

या भेटीदरम्यान काही मिनिटे स्वतंत्र चर्चा करण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरे म्हणाले की, आमचे जुने संबंध आहेत. त्यामुळे आम्ही काही खासगी विषयांवर बोलत होतो. यापेक्षा अधिक काही नाही.