मुंबईत मुंबादेवीमध्ये गणपती मंडपाजवळ पक्षाचा फलक लावण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला ढकलून देत मारहाण केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. विनोद अरगिळे असं आरोपीचं नाव आहे. ते मनसेचे उपविभाग अध्यक्ष आहेत. या मारहाणीवरून अरगिळेंवर जोरदार टीका होत आहे. यानंतर विनोद अरगिळेंना महिलेला मारहाण करणं राज ठाकरेंना तरी पटेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोद अरगिले म्हणाले, “मी केलेली मारहाण राज ठाकरेंना पटणार नाही, मलाही ते योग्य वाटत नाही. माझ्याकडून रागाच्या भरात चूक झाली आहे. मात्र, आमचं काही संरक्षण नको का? त्या बाईनेही ही चूक करण्यासाठी मला का प्रवृत्त केलं? ती आमच्याशी बोलू शकत होती, तिने वासा का ढकलला? महिलांवर हात उचलणं योग्य नाही. मात्र, त्यांनी वासा ढकलला, तो पडला असता तर अनेक लोक जखमी झाले असते.”

व्हिडीओ पाहा :

“…तर अनेकजण जखमी झाले असते”

“ती बाई कोट्याधीश असून रोडवर हप्ता खाते. ती रोज रोडवर धंदे लावते. तिला विभागातील सर्वच नागरिक त्रासले आहेत. आम्ही गणेशभक्तांच्या स्वागतासाठी गेट लावत होतो तेव्हा या बाईने २० फुटांचा वासा ढकलून दिला. तो लाकडी वासा कुणाच्या अंगावर पडला असता तर अनेकजण जखमी झाले असते. हे राज ठाकरेच्या घरी लावा असं ही बाई म्हणाली. तसेच माझ्या अंगावर आली,” असा आरोप विनोद अरगिलेंनी केला.

“आम्ही पोलिसांना माहिती दिली, त्याचं रेकॉर्डिंग आहे”

अरगिले पुढे म्हणाले, “मी एवढ्या वर्षांपासून येथे काम करतो. या व्हिडीओत केवळ एक बाजू दाखवली आहे. ती बाई आमच्या अंगावर येते. हवंतर आजूबाजूच्या दुकानदारांना विचारा. त्या बाईने येऊन थेट तो गेटचा वासा ढकलला. तसेच आम्हाला शिवीगाळ केली. याबाबत आम्ही पोलिसांना फोन करून माहिती दिली आहे. त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंगदेखील आहे. याआधीही आम्ही या बाईविरोधात तक्रार केली आहे,” असं विनोद अरगिलेंनी सांगितलं.

“आम्ही हातगाड्यांविरोधात आहोत म्हणून हे षडयंत्र”

“या महिलेने थेट माझी कॉलर पकडली, मग आम्ही बचावासाठी काहीच करायचं नाही का? महिलांचा आदर, सन्मान केला पाहिजे हे ठीकच आहे. त्याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र, महिलांनीही पुरुषांचा आदर, सन्मान राखला पाहिजे. आम्ही हातगाड्यांविरोधात आहोत म्हणून हे षडयंत्र रचलं जात आहे. त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. न्यायालयातही खटला दाखल आहे. हा हातगाडीचालकांनी केलेला कट आहे. विभागातील आमच्या विरोधकांचा यात समावेश आहे,” असा आरोप अरगिलेंनी केला.

हेही वाचा : “‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते, आता मात्र…”, काँग्रेसची टीका

“ही महिला दररोज दुकानदारांकडून १०० रुपये घेते. दुकानदार त्रासलेले आहेत. असे पैसे घेणं कायद्यात बसतं का? मी माध्यमांना प्रत्येक दुकानवाल्याकडे घेऊन जाईन,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader comment on beating of women in mumbaidevi and raj thackeray pbs
First published on: 01-09-2022 at 18:38 IST