मुंबई : मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता अधिक आक्रमक झाली आहे. रविवारी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी गुजराथी भाषिकांना डिवचणारा एक टिर्शट घातला आहे. ‘परेस, नरेस, सुरेस.. चड्डीत रहायचं’ असा संदेश या टिशर्वटर लिहिला आहे. त्यात मुद्दाम गुजराथी भाषिकांच्या उच्चारांचा संदर्भ देत ‘श’ ऐवजी ‘स’शब्द लिहून त्यांची खिल्ली उडवली आहे. रविवारी या टिशर्टचे छायाचित्र प्रसारित केल्यानंतर समाज माध्यमांवर जोरदार वाद विवाद सुरू झाला आहे.
राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे आक्रमक झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर राज्यभर वातावरण पेटले आहे. मराठी बोलण्यास नकार देणार्यांना ठिकठिकाणी चोप दिला जात आहे. जुलै महिन्यात मिरा रोड मध्ये परप्रांतीय विक्रेत्याला झालेली मारहाण झाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून व्यापार्यांनी बंद पाळला होता. त्याविरोधात एकजूट दाखविण्यासाठी मराठीजनांचा मोर्चा निघाला होता. या पार्श्वभूमीवर त्याच मिरा रोड मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी सभा घेऊन मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला होता. हा वाद शमला नसताना आता दादर मधील कबुतरखाना हटविण्यावरून गुजराथी भाषिक, जैन विरूध्द स्थानिक मराठी असा वाद पेटला आहे. स्थानिक मराठी भाषिकांनी कबुतरखान्याला विरोध केला आहे. गुजराथी आणि जैन भाषिकांनी मागील सोमवारी कबुतरखान्याजवळ आंदोलन केले होते. त्याला आता मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी टि-शर्टच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले आहे.
श ऐवजी स
गुजराथी भाषिक ‘श’ चा उच्चार ‘स’ असा करतात. तो संदर्भ घेऊन देशपांडे यांनी आपल्या टि शर्टवर परेस, नरेस, सुरेस चड्डीत रहायचं असा इशारा दिला आहे. रविवारी देशपांडे याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्मयावर हे टिशर्ट परिधान केलेेले छायाचित्र प्रसारीत केले आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. मराठीची गळचेपी करून दादागिरी करणार्या गुजराथी भाषकांना हा सणसणीत इशारा असल्याचे काहींनी सांगितले. मनसे हिंदुत्वाचा पुरस्कार करताना हिंदू असलेल्या गुजराथी भाषिकांना लक्ष्य करत असल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर मुस्लिमांची नावे लिहिण्याची हिंम्मत आहे का? असाही प्रश्नही उपस्थित केला आहे.
उत्तरभारतीयांकडून गुजराथी लक्ष्य
मनसेचे पूर्वीपासूनचे आंदोलन हे उत्तरभारतीयांविरोधात राहिले आहेत. मात्र मिरा रोड मधील घटनेनंतर मनसेचा रोख गुजराथी, मारवाड्यांकडे वळलेला दिसून येत आहे. त्यातच मराठीबहुल दादर भागातील जैन आणि गुजराथी समाजाने केलेल्या आंदोलनामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे मनसेने मराठीजनांच्या बाजून उतरून गुजराथी आणि जैनांना विरोध केला आहे. संदीप देशपांडे यांच्या टिशर्टवरील हा संदेश त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.
‘हिंदी नाही तर हिंदू…..
यापूर्वी संदीप देशपांडे यांनी मी हिंदू आहे हिंदी नाही असा संदेश देणारे टि-शर्ट घातले होते. त्यावरूनही वाद झाला होता. हिंदू शब्दातील ‘दूू’ हे अक्षर दिर्घ लिहिण्याऐवजी -हस्व लिहिल्याने टिकाही झाली होती. त्यापाठोपाठ आता हे दुसरं टिशर्टमुळे वाद निर्माण झाला आहे. ‘लाव रे तो व्हिडियो’ पाठोपाठा ‘घाल रे तो टिशर्ट’ अशीही मिश्किल चर्चा होत आहे.