गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेचा बालेकिल्ला ठरलेल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील सेल्फी पॉईंट आता बंद झाला आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवाजी पार्क येथील वॉर्ड क्रमांक १९४ मधून मनसेचा पराभव झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉईंट साकारला होता. या परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी आणि तरूणांसाठी हा सेल्फी पॉईंट आकर्षणाचा विषय ठरला होता. याठिकाणी करण्यात येणाऱ्या सजावटीमुळे सेल्फी काढणाऱ्या तरुणांसाठी हे ठिकाण हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, आता पालिका निवडणुकीत पराभव झाल्याने या सेल्फी पॉईंटच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट बंद केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क भागात नगरसेवक असताना सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आला होता. मुंबईतील पहिलाच अशाप्रकारचा सेल्फी पॉईंट असल्याने तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळी संदीप देशपांडेच्या पत्नी स्वप्ना देशपांडे या शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यांनंतर अगदी काही दिवसातच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी सीएसआर निधी उपलब्ध होत नसल्याचं कारण देत सेल्फी पॉईंट बंद केला आहे.

पाच वर्षांपूर्वी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक देत मनसेने शिवसेनेला चारीमुंडय़ा चित केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्याचे शल्य बोलून दाखवले होते. जखम मोठी होती. मराठी माणसाने शिवसेनेऐनजी मनसेच्या राजाला साथ दिली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेनेने लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करत महापालिका निवडणुकीत आपला बालेकिल्ला पुन्हा हस्तगत केला.

स्थापनेनंतर राज यांनी केलेल्या घणाघाती भाषणांमुळे एक अपेक्षा निर्माण होऊन लोकांनी मनसेला मोठय़ा प्रमाणात साथ दिली. त्या तुलनेत मवाळ असलेल्या व सौम्य भाषण करणाऱ्या उद्धव यांना लोकांनी त्यावेळी नाकारले होते. तथापि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका लोकांना भवली होती. दादरची जखम शिवसेनेसाठी मोठी होती. त्यामुळे मतदारसंघाची बांधणी  मजबूत करण्यावर उद्धव यांनी भर दिला तर मनसे या काळात संपूर्ण गाफिल राहिली. मतदारांना गृहित धरून मनसेचे पदाधिकारी वावरत होते. त्याचाच फटका दादरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेला यावेळी बसला. मनसेच्या एका नगरसेविकेला लाच घेताना पकडण्यात आले तर सात नगरसेवकांपैकी संदीप देशपांडे व संतोष धुरी वगळता फारसा प्रभाव कोणी पाडला नव्हता. परिणामी संदीप देशपांडे यांचा मतदारसंघ महिला झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला तेथून उमेदवारी दिली तर शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली. याशिवाय विरेंद्र तांडेल व सुधीर जाधव यांचेही मतदारसंघ महिला झाल्यामुळे त्यांच्या पत्नींना मनसेतर्फे उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेने माहीममधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांना तर संतोष धुरी यांच्या विरोधात आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांची कन्या शितल देसाई यांनी भाजपमधून मिळवलेला विजय वगळता पाचही जागा शिवसेनेने पुन्हा हस्तगत करून बाळासाहेबांचे बालेकिल्ला जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandip deshpande closed down selfie point in dadar shivaji park
First published on: 01-03-2017 at 17:06 IST