पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यात यावं या मागणीसाठी मनेसनं मोर्चा काढला आहे. या मोर्चापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेनं भूमिका बदलली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शर्मिला ठाकरे यांनी मनसेनची भूमिका स्पष्ट केली.
मोर्चाला रवाना होण्यापूर्वी शर्मिला ठाकरे म्हणाल्या,”आजच्या मोर्चासंदर्भात जे काही विषय मांडायचे आहेत, ते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे मांडतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कधीही भूमिका बदलली नाही. आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेेलं नव्हतं. रझा अकादमीनं केलेल्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता,” असं त्या म्हणाल्या.
मनसेच्या नव्या झेंड्याविषयीही शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. भाजपाचा भगवा आणि मनसेचाही भगवा? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “मनसेच्या जुन्या झेंड्यातही भगवा होता. भगवा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकऱ्यांचा आहे,” असं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे काय बोलणार?
सीएए आणि एनआरसीवरून देश घुसळून निघालेला असताना राज ठाकरे यांनी प्रथमच घुसखोरांविरूद्ध भूमिका मांडली. या घुसखोरांना बाहेर काढण्यात यावं, असं ते म्हणाले होत. त्यावरून सीएएला मनसेचं समर्थन असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरही त्यांनी खुलासा केला. “बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला, असं आपण म्हणालो होतो. सीएएचं समर्थन केलं नाही. आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला,” असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावर राज ठाकरे आज काही बोलणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.