मनसे लोकसभेच्या सर्व जागा लढण्यासाठी तयारी करत आहे. शुक्रवारी कृष्णभुवन येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज यांनी आयोजित केली असून त्यात रणनीती ठरविण्यात येणार आहे.  चार राज्यांत भाजपला मिळालेला विजय, मोदींचा वाढता करिष्मा आणि काँग्रेसविरोधी देशातील लाट पाहाता मनसेने महायुतीत सामील व्हावे असे मनसेच्या काही आमदार व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि ‘आप’ला दिल्लीत मिळालेले यश पाहता महायुतीत सामील झाल्यास त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार असा सवाल काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. महायुतीत सामील झाल्यास मनसेची वाढ खुंटू शकेल अशीही भिती काही आमदारांनी व्यक्त केली असून राज यांनीही राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून लोकसभेच्या सर्व जागा लढविता येईल का, याचा आढावा घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
महायुतीत सामील व्हायचे असल्यास युतीच्या विजयी झालेल्या १९ जागा वगळूनच जागावाटपाबाबत चर्चा होऊ शकेल.
शिवाय सध्याच्या परिस्थितीत मनसेला किती व कोणत्या जागा मिळतील तसेच त्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात मनसेचे बलाबल काय आहे याचाही विचार मनसेतर्फे करण्यात आला असून स्वतंत्रपणे सर्व जागा लढणे हाच पर्याय योग्य राहील असे मत मनसेच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.