मुंबई: लोकल ट्रेन मध्ये महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा मुद्दा मराठी भाषेवर येऊन ठेपला आहे. ‘मराठी येत नसेल तर मुंबईतून चालते व्हा’ असे सांगत लोकल ट्रेन मधील महिला आक्रमक झाल्याची चित्रफित समाजमाध्मयावर प्रसारित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेेचे स्वागत केले आहे. सर्वसामान्य महिलांमधील मराठी भाषेचा स्वाभिमान जागृत होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकऱणी कुठलीही तक्रार न आल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवार १८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या भायखळा आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती. लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात जागेवरून भांडण सुरू होते. महिला एकमेकांशी भांडत होत्या. एक महिला हिंदीत वाद घालत होती. त्यावेळी एका महिलेने मराठी येत नसेल तर मुंबईतून चालते व्हा असा इशारा दिला. त्यानंतर इतर मराठी भाषिक महिला एकवटल्या आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्या. बसण्याच्या जागेवरून सुरू झालेले भांडण थेट मराठी भाषेच्या मुद्द्यावर पोहोचेले.
मनसेकडून स्वागत
मनसेने या घटनेचे स्वागत केले असून मराठीसाठी लोक आग्रही होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शुक्रवारी मिरा रोड मध्ये मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची जाहीर सभा होती. त्याचवेळी ट्रेन मधील मराठी महिला मराठी भाषेच्या स्वाभिमानाने भारावलेल्या होत्या. मराठीच्या आग्रहासाठी सर्वसामान्य महिला भांडत आहेत. ही सर्वसामान्य मराठी नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचे मनसेने म्हटले आहे. मुंबईत मराठी माणसांचा आवाज दाबला जात होता. परंतु आता आमचे नेते राज ठाकरे यांनी आक्रमकपणे मराठीचा मुद्दा मांडल्याने लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण झाला आहे. लोकं उघडपणे मराठीत बोलू लागले आहे. ही चांगली गोष्ट आहे, असे मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी मिरा रोड येथील जाहीर सभेत मराठीचा अवमान केल्यास धडा शिकवला जाईल, असा जाहीर इशारा दिला होता. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटताना दिसत आहे, असेही ते म्हणाले.
तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नाही
ही घटना शुक्रवार १८ जुलैची आहे या वादाची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित होत असली तरी याप्रकरणी कुणाही महिलेने तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
मनसे आक्रमक
शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी विषय शिकविण्याच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेनेने जोरदार विरोध केल्याने राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) उध्दव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि मुंबईत विजयी मेळावा संपन्न झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य पसरले आहे. मिरा रोड मध्ये परप्रांतिय मिठाई विक्रेत्याला मारहाण केल्यानंतर विक्रोळी आणि विरार मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. विक्रोळीत मराठी भाषेबाबत अवमानकार व्हॉटसअप स्टेटस ठेवणार्या औषध विक्रेत्याला मनसेने चोप देत धिंड काढली होती. विरार मध्येही मराठीच्या मुजोर रिक्षाचालकाला मराठीचा अवमान केल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला होता.