गेल्या अडीच वर्षांत मुंबई रेल्वेमध्ये प्रवाशांचे तब्बल ६२ कोटी रुपयांचे २६ हजाराहून अधिक मोबाइल चोरीला गेले असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापैकी जीआरपीने ४५ टक्के प्रकरणांचा तपास पूर्ण करत जवळपास २० कोटी रुपयांचे ११,८५३ मोबाइल जप्त केले आहेत. जानेवारी २०२३ ते मे २०२५ या अडीच वर्षांच्या कालावधीत मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या मोबाइल चोरीची आणि त्यानंतर केलेल्या कार्यवाहीची माहिती जीआरपीकडून देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

जीआरपीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत सुमारे ४५ टक्के प्रकरणे सोडवण्यात यश आले आहे. २० कोटी रुपयांचे ११,८५३ मोबाइल परत मिळविण्यात आले. मागच्या महिन्यात जीआरपीच्या आयुक्तपदाची जबाबदारी राकेश कलासागर यांनी स्वीकारल्या नंतर कारवाईचा वेग वाढला आहे. एकाच महिन्यात ५०० चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाइल फोन शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत केले गेले.

विशेष सायबर सेलकडून मोबाइलचा शोध

चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास महिनोनमहिने चालूच असतो. या कामात रेल्वे पोलिसांना मदत करण्यासाठी जीआरपी आयुक्तालयात विशेष सायबर सेल तयार करण्यात आला आहे. “चोरीला गेलेला मोबाइल जेव्हा दुसरी व्यक्ती वापरू लागते, तेव्हा आम्ही त्यांचे लोकेशन ट्रॅक करून मोबाइल पुन्हा मिळवतो”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्राबाहेर मोबाइलची विक्री

मुबंईत चोरीला गेलेले मोबाइल झारखंड, बिहार आणि राजस्थानसारख्या राज्यामध्ये आढळले आहेत. चोरीला गेले मोबाइल परत मिळवण्यासाठी जीआरपी ने देशभरात पथक सुरु केली आहेत. चोरीचा मोबाइल खरेदी करणाऱ्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांतील मोबाइल चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी नशेखोर आणि चोरी करणाऱ्या टोळ्यांपर्यंत अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. अलिकडेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तुफैल मेमन या माजी विद्यार्थ्याला जीआरपीच्या गुन्हे शाखेने २१ चोरीच्या मोबाइलसह अटक केली. २५ वर्षीय तुफैल मेमनने पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडून दिले होते. पोलिसांनी सांगितले की, त्याला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते आणि पैशांची गरज असल्याने तो गुन्हेगारीकडे वळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका वेगळ्या प्रकरणात, रेल्वेमध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील एका सदस्याला जीआरपीने अटक केली. ही टोळी वाराणसीतील गंगा आरती आणि ओडिशातील जगन्नाथ यात्रेसारख्या गर्दीच्या ठिकाणी चोरी करत असे. चोरट्यांनी चोरलेले मोबाईल दोन प्रकारात विभागले जायचे. महाग मोबाइल परदेशात विकले जात, तर बाकीचे स्थानिक बाजारात ‘रिसीव्हर’ना दिले जात. काही मोबाइलचे सुटे भाग काढून ते दुरुस्त करून पुन्हा भारतात विकले जात, असे पोलिसांनी सांगितले.

जीआरपीच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये १२,१५९ मोबाइल चोरीला गेले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या कमी होऊन १०,९८१ झाली. कमी उत्पन्न गटातील लोक दुरुस्त केलेले फोन विकत घेतात आणि ते गावाकडे नेतात किंवा नातेवाईकांना वापरायला देतात.