मुंबई : अतिमुसळधार पावसाचा फटका रस्ते आणि उपनगरीय रेल्वे सेवेला बसता असतानाच मंगळवारी सायंकाळी चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेची सेवाही अचानक विस्कळीत झाली. मोनोरेल गाडीचा वीज पुरवठ्यात समस्या निर्माण होऊन वीजपुरवठा खंडीत झाला आणि म्हैसूर काॅलनी मोनोरेल स्थानकाजवळ मोनोरेल गाडी थांबली.

या घटनेची माहिती मिळताच महा मुंबई मेट्रो ऑपरेशन काॅर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिघाडाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तर दुसरीकडे गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

मोनोरेल गाडी बऱ्याच वेळाने एकाच ठिकाणी थांबली असून गाडीतील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना गुदमरल्यासारखे होत आहे, काहींना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

प्रवासी घाबरले असून गाडीचा दरवाजा उघडण्यात अडचणी येत आहेत. या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढून स्थानकापर्यंत नेण्यासाठी दुसरी मोनोरेल गाडीही ट्रॅकवर आणण्यात आली आहे.

मात्र प्रवाशांना बाहेर काढणे अडचणीचे ठरत असून आता यासाठी किती वेळ लागेल हा प्रश्न आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तेही प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. दीड तास प्रवासी आत असल्याने दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण झाला आहे.