मुंबई : मोसमी पावसाचे आगमन देशात सरासरीपेक्षा आठवडाभर अगोदर झाले असले तरीही कुठे अतिवृष्टी आणि कुठे पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महाराष्ट्रापासून दक्षिण भारतात अपेक्षित वेगाने पेरण्या होताना दिसत नाहीत. १३ जूनपर्यंत देशात ९० लाख हेक्टर, तर राज्यात १६ जूनपर्यंत १२ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पेरणी योग्या वाफसा (ओल) नसल्यामुळे पेरण्या संथगतीने होताना दिसत आहेत.
मोसमी पाऊस राज्यभरात सक्रीय झाला आहे. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम मराठवाड्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. सध्याही याच भागात पावसाचा जोर आहे. त्यामुळे शेत जमिनीत चिखल आहे. वाफसा नसल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. माळरानावर, हलक्या प्रतीच्या जमिनीत पेरण्या सुरू आहेत. पण, खोल काळ्या शेतजमिनीत अद्याप वाफसा नाही. विदर्भात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विदर्भात पेरण्यांनी अद्याप गती घेतलेली नाही. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा केवळ सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
पुणे विभागात सर्वाधिक, नागपूर विभागात सर्वात कमी
पुरेशा पावसाअभावी विदर्भात सरासरीच्या फक्त १.०३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अमरावती विभागातही पेरण्या जेमतेम २.६२ टक्क्यांवर आहेत. त्या तुलनेत लातूर विभागात ११.९८ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ५.०९ टक्के, कोल्हापूर विभागात १०.४ टक्के, नाशिक विभागात १२.२८ टक्के आणि कोकण विभागात १.३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागात सर्वाधिक पुणे विभागात २०.३८ टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत. कोकणात पाऊस चांगला असला तरीही भात रोपे आल्यानंतर पेरण्यांना वेग येईल.
सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस
अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात १७ जूनपर्यंत सरासरीच्या शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे.
देशात ९० लाख हेक्टरवर पेरा
देशात १५ जूनपर्यंत खरीप पेरणी ९० लाख हेक्टरवर गेली आहे. देशात खरीप हंगामात साधारण १०९६.६४ लाख हेक्टर खरीप पेरणी होते. त्यापैकी १३ जूनपर्यंत ८९.२९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. भात, मूग, ज्वारी, सोयाबीन आणि मका पिकांच्या पेरण्या वेगाने सुरू आहेत. दरम्यान, कापसाची १३.१९ लाख हेक्टरवर आणि उसाची ५५.०७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.