मुंबई : मोसमी पाऊस शनिवारी केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मागील दोन दिवसांपूर्वी मोसमी वाऱ्यांची वाटचाल केरळच्या दिशेने होण्यास पोषक वातावरण असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, यंदा मोसमी वारे केरळमध्ये सरासरी वेळेच्या ८ दिवस आधी आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत लवकर दाखल झाले आहेत.
पोषक वातावरण असल्यामुळे यंदा मोसमी वारे अंदमानमध्येही लवकर दाखल झाले होते. नेहमीच्या वेळेआधी म्हणजेच १३ मे रोजी मोसमी वारे दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मोसमी वारे दाखल झाले होते. त्यानंतरही पोषक वातावरण असल्याने मोसमी वाऱ्यांची वाटचाल जलद गतीने सुरू होती. मोसमी वारे केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र अंदाजित वेळेच्या एक दिवस आधीच मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मोसमी वाऱ्यांनी शनिवारी संपूर्ण केरळ आणि तमिळनाडूचा बहुतांशी भाग व्यापून कर्नाटकच्या काही भागापर्यंत प्रगती केली आहे. याबरोबरच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण भाग, संपूर्ण लक्षद्वीप बेटे, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात मोसमी पाऊस एक दिवस आधीच दाखल झाला. मोसमी वाऱ्यांनी शनिवारी गोव्यापर्यंत मजल मारली. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, केरळमध्ये मोसमी पाऊस सामान्यत: १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) पावसाचे आगमन होते. यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. त्यानुसार केरळमध्ये शनिवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.
१६ वर्षांचा विक्रम मोडला
यापूर्वी २३ मे २००९ रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी शनिवार, २४ मे रोजी मोसमी पाऊस वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा म्हणजेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यापूर्वी केरळमध्ये दाखल होण्याचा दिवस
२०२४- ३० मे
२०२३- ८ जून
२०२२- २९ मे
२०२१- ३ जून
२०२०- १ जून
२०१९- ८ जून
२०१८- २९ मे
२०१७- ३० मे
२०१६- ८ जून
२०१५- ५ जून
फलटणमध्ये उन्हाळ्यात धबधबा
एरवी रणरणत्या असणाऱ्या मे महिन्यात यंदाच्या पावसाळी वातावरणामुळे धबधबे वाहू लागले आहेत. दुष्काळी फलटण तालुक्यातील धुमाळवाडी (ता फलटण) येथील प्रसिद्ध धबधब्याचे शनिवारचे हे दृश्य. ऐन उन्हाळ्यातील दुष्काळी तालुक्यातील हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.