‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३’ प्रकल्पाच्या मार्गिकेतील पाच स्थानकांच्या नावाच्या अधिकारातून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) २१६ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.मेट्रो प्रकल्पाअंतर्गत तिकीटाव्यतिरिक्त अन्य पर्यायातून महसूल मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मेट्रो स्थानकावर, मेट्रो गाड्यांमध्ये जाहिरातीस परवानगी देण्यात येते. खाद्यपदार्थ आणि इतर स्टॉलच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळवले जाते. त्याचवेळी विविध नामांकित कंपन्यांना मेट्रो स्थानकाच्या नावाच्या अधिकारातूनही महसूल मिळवला जातो. त्यानुसार ‘मेट्रो ३’ कार्यान्वित झाल्यानंतर एमएमआरसीला मेट्रो स्थानकाच्या नावाच्या अधिकारातून २१६ कोटींचा महसूल मिळणार असल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात; म्हणाले, “ज्यांना सत्तेचं दूध पाजलं…”
कोटक महिंद्रा बँकेकडे वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानकाचे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे, आयसीआयसीआय लोम्बार्डकडे सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे (एलआयसी) चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रो स्थानकांचे अधिकार देण्यात आले आहेत. या कंपन्यांना प्रसिद्धीसाठी मेट्रो स्थानकात जागा मिळणार आहे. तसेच मेट्रो गाडीच्या घोषणांमध्ये आणि स्थानकांच्या नकाशांमध्ये या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. सोबतच त्या कंपन्यांचे नाव संबंधित स्थानकाच्या नावा आधी जोडले जाणार आहे. मेट्रो-३ स्थानकांद्वारे दरवर्षी प्रतिस्थानक सरासरी ८ कोटी रुपये महसूल मिळणार असून ही रक्कम आजपर्यंत भारतील सर्वाधिक आणि जगातील सर्वाधिक उत्पन्न प्राप्त करणाऱ्या मेट्रो स्थानकांपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये ५% वाढीसह सदर नाव अधिकाराद्वारे एकत्रितपणे २१६ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे.