मुंबई : मुंबई महानगर परिसरातील घरविक्रीत वाढ कायम असून त्या तुलनेत नव्या घरांची निर्मिती झालेली नाही. मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी मुंबई महानगरात अद्याप तीन लाखांहून अधिक घरे रिक्त आहेत.

पुण्यातही ८९ हजार घरे रिक्त असल्याचा अहवाल ‘लायसेस फोरास’ या संशोधन कंपनीने जारी केला आहे. मुंबई महानगर, पुणे, दिल्ली महानगर, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, कोलकता या आठ प्रमुख शहरांमधील घरविक्री व निर्मिती तसेच रिक्त घरांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.

रिक्त घरांच्या संख्येत किंचित घट

● यंदाच्या वर्षांत मुंबई महानगरात एक लाख ६२ हजार २४ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षांत एक लाख २९ हजार ७९३ घरांची झालेली विक्री पाहता यंदा घरांच्या विक्रीत २४.८ टक्के वाढ झाली.

● पुण्यात यंदा ८५ हजार ५२ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी ७८ हजार ९७ घरांची विक्री झाली होती. ही वाढ ८.९ टक्के आहे. त्याचवेळी मुंबई महानगर आणि पुण्यात नव्याने विक्रीसाठी उपलब्ध घरांच्या संख्येत अनुक्रमे २.२ टक्के आणि १२.६ टक्के घट झाली आहे.

● मुंबई महानगरात यंदा नव्याने एक लाख ४४ हजार ८७० घरे उपलब्ध झाली. २०२३-२४ मध्ये एक लाख ४८ हजार घरे उपलब्ध होती. पुण्यात यंदा ५८ हजार ७५८ घरांची निर्मिती झाली. गेल्या वर्षी ६७ हजार २१४ घरे विक्रीसाठी उपलब्ध होती, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

● मुंबई महानगरात रिक्त घरांची संख्या २०२३-२४ अखेरीस तीन लाख २९ हजार ८२ इतकी होती. मार्च २०२५ अखेर तीन लाख पाच हजार २६७ इतकी रिक्त घरे उपलब्ध होती.

● पुण्यात २०२३-२४ अखेरपर्यंत एक लाख एक हजार १४६ रिक्त घरे होती. मार्च २०२५ पर्यंत त्यात घट होऊन आता ८९ हजार ५४२ घरे रिक्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

रिक्त घरांची संख्या गेल्या १९ महिन्यांपासून कायम आहे. यंदा या रिक्त घरांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. नव्या घरांच्या निर्मितीत वाढ झालेली नसली तरी रिक्त घरांमुळे मागणी वाढली तरी समतोल साधला जाणार आहे. घरांच्या किमतीतही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे भविष्यात आशादायक स्थिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज कपूरव्यवस्थापकीय संचालक, ‘लायसेस फोरास’