मुंबईः मृत्यू झाल्याचा बनाव रचून दोन कोटी रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई व मुलाविरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. आरोपीने एलआयसीकडे बनावट कागदपत्र सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली.
एलआयसीचे दादर शाखेचे अधिकारी ओमप्रकाश साहू यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक, कट रचणे, फसवणुकीचा प्रयत्न आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिनेश टाकसाळे व त्यांची आई नंदाबाई टाकसाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी दिनेशने जुलै २०१७ मध्ये एलआयसीकडे दोन कोटी रुपये रकमेच्या विम्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून स्वतःची मिळकत अधिक दाखवली होती. तो अर्ज एलआयसीकडून मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर नुकतीच दिनेशची आई नंदाबाई यांनी दिनेशचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवून दोन कोटी रुपयांचा विम्याच्या रकमेची मागणी केली. त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. याबाबत एलआयसीकडून तपासणी करण्यात आल्यानंतर दिनेश जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलआयसीने याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीने दोन कोटी रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यापूर्वीच एलआयसीच्या पथकाने या दाव्याची पडताळणी केली असता तो खोटा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.