मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानुसार नुकताच म्हाडा आणि अदानी समुहात करार झाला आहे. मात्र रहिवाशांना विश्वासात न घेता, त्यांच्या मागण्यांचा विचार न करता आणि महत्त्वाचे म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत प्रकल्प न राबवता करार करण्यात आल्याचा आरोप मोतीलाल नगर विकास समितीने केला आहे.
पुनर्विकासात मनमानी सुरु असल्याचे म्हणत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आता मोतीलाल नगरवासीयांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी, १६ जुलैला आझाद मैदानावर मोतीलाल नगरवासीय धरणे आंदोलन करणार आहे.
मोतीलाल नगर म्हाडा वसाहत १४२ एकरवर वसली असून ३७०० सदनिका आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मोतीलाल नगरचा पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार सी अँड डी म्हणून अदानी समुहाची नियुक्ती करण्यात आली आहे. अदानी समुहाला याआधीच इरादा पत्र देण्यात आले आहे. तर ७ जुलैला म्हाडा आणि अदानी समुहामध्ये पुनर्विकासासाठी करार झाला आहे. त्यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे.
मोतीलाल नगरवासीयांनी मात्र या करारावर नाराजी व्यक्त केली आहे. मोतीलाल नगर विकास समितीच्या म्हणण्यानुसार रहिवाशांना विश्वासात न घेता, मनमानीपणे प्रकल्प पुढे रेटला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत निवासी रहिवाशांना १६०० चौ. फुट कार्पेट एरियाचे घर दिले जाणार आहे. तर अनिवासी रहिवाशांना ९७१ चौ. फुट कार्पेट एरियाचा गाळा दिला जाणार आहे. ही घरे, गाळे रहिवाशांना मान्य नाहीत.
रहिवाशांच्या म्हणण्यांनुसार निवासी रहिवासी २४०० चौ. फुट कार्पेट एरियाच्या घरासाठी तर अनिवासी रहिवासी २०७० चौ. फुट कार्पेट एरियाच्या गाळ्यासाठी पात्र आहेत, असे असताना छोट्या घरांवर, गाळ्यांवर रहिवाशांची बोळवण केली जात आहे. मोठी घरे देण्याची आमची मागणी न्याय असून त्याकडे दुर्लक्ष करून पुनर्विकास पुढे रेटला जात असल्याचा आरोप मोतीलाल नगर समितीने केला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या मनात रोष आहे आणि याच पार्श्वभूमीवर धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रहिवाशांना २४०० चौ. फुट कार्पेट एरियाचे घर आणि अनिवासी रहिवाशांना २०७० चौ. फुट कार्पेट एरियाचा गाळा मिळावा, ३० लाख रुपये काॅर्पस फंड मिळावा आणि रहिवाशांना विश्वासात घेऊन पुनर्विकास मार्गी लावावा अशा मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन असणार आहे. बुधवारी, १६ जुलैला दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रहिवाशांचे धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती मोतीलाल नगर विकास समितीचे पदाधिकारी निलेश प्रभू यांनी दिली.