प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : सुमारे १३५ वर्षांपूर्वी मुंबईतील गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी उभारण्यात आलेल्या फोर्ट येथील द पारसी लाइन इन रुग्णालयात पालिकेच्या परवानगीविना चित्रीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने रुग्णालय प्रशासन आणि संबंधित संस्थेला नोटीस बजावल्यानंतरही चित्रीकरण सुरूच ठेवण्यात आल्याने प्रशासनाने कारवाई करून चित्रीकरण बंद केले.
मुंबईत १९ व्या शतकाच्या सुरुवातीला घरामध्येच महिलांची प्रसूती होत होती. सुविधांअभावी बाळंतीण आणि बाळाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन काही मंडळींनी १८८७ मध्ये फोर्ट परिसरातील आताच्या घनश्याम तळवडकर मार्गावर मुंबईतील पहिले ५० खाटांचे ‘द पारसी लाइन इन प्रसूती रुग्णालय’ सुरू केले. गॉथिक शैलीतील हे मुंबईतील पहिलेच प्रसूती रुग्णालय. कालौघात १९६० मध्ये हे प्रसूती रुग्णालय बंद करण्यात आले. आता या बंद इमारतीत चित्रपट, वेबमालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
शंभरहून अधिक वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत चित्रीकरण करताना काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, या वास्तूमध्ये मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेताच चित्रीकरण करण्यात येत असल्याची बाब माहितीचा अधिकार कार्यकर्ते संजय गुरव यांनी महानगरपालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर ‘ए’ विभाग कार्यालयाने ‘द पारसी लाइन इन रुग्णालया’च्या प्रशासनाला ५ एप्रिल २०२२ रोजी नोटीस बजावली होती. तसेच या ठिकाणी परवानगीविना मंडप आणि व्यासपीठ उभारण्यात आल्याने संबंधित संस्थेवर नोटीस बजावून शुल्क आणि दंडाची रक्कम भरण्याची सूचना केली होती.
पालिकेच्या नोटिशीनंतरही सोमवारी चित्रीकरण सुरूच ठेवण्यात आल्याने ‘ए’ विभाग कार्यालयातील इमारत आणि कारखाने विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी रुग्णालयात धाव घेतली. केवळ स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेऊन तेथे चित्रीकरण करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. रुग्णालयाच्या आवारात परवानगीविना उभारण्यात आलेल्या शेडवर इमारत आणि कारखाने विभागाने कारवाई केली. तसेच दंडात्मक कारवाई करून चित्रीकरणही बंद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चित्रीकरणादरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेने परवानगी दिलेली नसताना पोलीस ठाण्याने ना हरकत दिली कशी, असा प्रश्न गुरव यांनी उपस्थित केला. त्यांनी पोलीस आयुक्त, आझाद मैदान पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेकडे या संदर्भात तक्रार केली आहे.
या रुग्णालयात सुरू असलेल्या चित्रीकरणासाठी ‘ए’ विभागाकडे कोणत्याही परवानगीसाठी अर्ज करण्यात आला नव्हता. त्यामुळे रुग्णालयात सुरू असलेले चित्रीकरण बंद करण्यात आले असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करावी असे आझाद मैदान पोलीस ठाण्याला कळविण्यात आले आहे. – शिवदास गुरव, साहाय्यक आयुक्त (प्र), ए विभाग कार्यालय