मुंबई : राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अधांतरी  आहे. आरक्षणावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर चालली असली तरी अन्य राज्यांत प्रचाराला जाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने दगाफटका केला. त्यामुळे अजित पवार गटानेही भाजपपासून सावध राहावे. तुम्हालापण भाजप कधीही धोका देईल, असा इशारा अजित पवार गटाला त्यांनी दिला.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत दिली होती. या घटनेला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. पुढे काय झाले हे आपणांस माहीत आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ३० दिवसांचा अवधी दिला. हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र सरकारने याकडे गंभीरपणे पाहिले नाही. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळली. यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचे हे अपयश समजून तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.