मुंबई : पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार अपेक्षित ठिकाणी सेवा बजावण्याची संधी मिळावी, यासाठी समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. या निर्णयानुसार विभागातील ५६१ पशुधन विकास अधिकारी व ६१ सहाय्यक आयुक्तांच्या पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १५ व १६ मे रोजी समुपदेशनाद्वारे सार्वत्रिक बदल्यांची कार्यवाही पशुसंवर्धन आयुक्तालयात सचिव डॉ. रामास्वामी एन. व आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे व सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय) डॉ. श्यामकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी म्हणून उपआयुक्त डॉ. प्रशांत भड यांनी काम पाहिले
राज्यातील पशुपालक हा पशुसंवर्धन विभागाच्या योजना व सेवांच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाच्या संधींचा लाभ घेत ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाला हातभार लावत आहे. अशा पशुपालकांचा चांगल्या सेवांच्या पुरवठ्यातून उत्साह वाढवत राज्याला पशुजन्य उत्पादनांत अग्रेसर करण्याची कामगिरी आपल्याला या पुढील काळात करावयाची आहे. हे काम सांघिक स्वरुपाचे असल्याने समुपदेशानच्या माध्यामातून बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुढील काळातही विभागाच्या हितासाठी अशाच प्रकारचे अभिनव निर्णय घेतले जाणार आहे. मनुष्यबळाची उपलब्धता आवश्यकतेप्रमाणे व्हावी, यासाठी पशुधन विकास अधिकारी (वर्ग-अ) पदाच्या २७९५ जागांसाठी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गाच्या ३११ जागांच्या भरतीचा प्रस्ताव एमपीएसीला सादर करण्यात आला आहे. पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या भरतीसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळात राज्यातील पशुसंवर्धनाच्या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याद्वारे पशुपालकांच्या क्षमतावृद्धीत शाश्वत बदल दिसून येतील, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.