*निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवरील काही ब्रिटीशकालिन उड्डाणपूल पाडून त्याऐवजी वांद्रे सागरी सेतुप्रमाणे केबल स्टेड पूल महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) उभारले जाणार आहेत. घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यानही ४५ वर्षे जुना उड्डाणपूल पाडून त्याऐवजी केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा पूल दिड ते दोन वर्षात बांधला जाणार आहे.

हेही वाचा >>> ‘जे’ औरंगजेबालाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार

काही वर्षापूर्वी झालेल्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या सर्व पुलांची आयआयटीमार्फत संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय रेल्वे, राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आला. त्यात काही पुलांची संरचनात्मक दुरुस्ती, तर काही उड्डाणपुलांची पुनर्बांधणी सुचवण्यात आली. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दहा उड्डाणपूल आणि एका भूमिगत रस्त्याच्या (रोड अंडर ब्रिज) पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले. हे काम मुंबई पालिकेच्या मदतीने एमआरआयडीसी करणार आहे. यामध्ये मुंबईतील दादर टिळक उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल,  भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड दरम्यान असलेल्या ब्रिटीशकालिन पुलाबरोबरच अन्य पूल पाडून त्याऐवजी वांद्रे सागरी सेतुप्रमाणे केबल स्टेड पूल बांधले जाणार आहेत. प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकावरूनही दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> सीएसएमटी पुनर्विकासासाठी पाच महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार; पुनर्विकासाला मिळणार गती

घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यानही ४५ वर्षे जुना उड्डाणपूल असून तो पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याऐवजी केबल स्टेड उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार असून त्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात आहे. तर या पुलाचे रेखाचित्र मंजुरीसाठी मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेकडेही पाठवण्यात आल्याची माहिती महारेलमधील अधिकाऱ्यांनी दिली.

अंधेरी आणि जवळपासच्या पश्चिम उपनगरातून येणाऱ्या वाहतुकीसाठी सुरळीत वाहतुक निर्माण होणार आहे. हा पूल घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्ग ते घाटकोपर पश्चिमेकडील एलबीएस मार्ग घाटकोपर अंधेरी लिंक रोडला जोडला जाईल.

वैशिष्ट्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– नवीन केबल स्टेड पुलाची एकूण लांबी दीड किलोमीटर असेल. ज्यामध्ये रेल्वे हद्दीत २१६ मीटरचा भाग केबल स्टेड भाग असेल.

– सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत पूल बांधण्याचा खर्च येणार आहे.

– नवीन उड्डाणपुलामध्ये दोन मीटरच्या पदपथासह चार मार्गिका असतील.

– घाटकोपरच्या सभोवतालचे सौंदर्य वाढवण्यासाठी, महारेलने संपूर्ण पुलावर सिग्नेचर थीम रोषणाई करण्याची योजना आखली आहे.