मुंबई : झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान वाहतूकीचे योग्य व्यवस्थापन करता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ७७.५७० किमीचा नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंग रोड) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यासाठी एमएसआरडीसीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यासाच्या अटी-शर्तीसाठी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्र, औद्योगिक केंद्र म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यामुळे नाशिक शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. अंतर्गत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. शहरातील अंतर्गत वाहतूकीचा ताण असतानाच मुंबई, ठाण्याकडून मालेगाव, मनमाड, चाळीगावला जाणारी किंवा चाळीसगाव, मालेगाव, मनमाडवरुन मुंबई, ठाण्याला येणारी वाहने नाशिक शहरातूनच जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. त्यातच नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यात देशभरातून लाखो साधू, भाविक नाशिकमध्ये येतात.

नाशिककडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर खूप गर्दी असते. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक परिक्रमा मार्ग बांधण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. नाशिक परिक्रमा मार्ग एकूण ७७.५७० किमी लांबीचा असून नाशिक तालुक्यातील २७ गावांमधून तो जाणार आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ६० पासून सुरु होऊन मुंबई-आग्रा महामार्ग ३० वरील आडगाव येथे संपणार आहे.

नाशिक परिक्रमा मार्गाला दोन आंतरबदल मार्ग असून त्यातील एक आंतरबदल मार्ग नाशिक विमानतळाला जोडणारा आहे तर दुसरा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. समृद्धी महामार्ग आंतरबदल मार्ग १३.१० किमीचा तर विमानतळ आंतरबदल मार्ग ४.२७० किमीचा असेल. या मार्गासाठी अंदाजे २६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर प्रकल्पासाठी अंदाजे ३६० हेक्टर जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याच्यासाठी एमएसआरडीसीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पासाठीच्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी, अटी-शर्ती निश्चित करण्यासाठी प्रकल्पाचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास करण्यात येईल, त्याचा अहवाल केंद्राला सादर केला जाईल, त्यानंतर पर्यावरणीय मंजुरी घेत प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्यादृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.