मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनप्रकरणी एसटी महामंडळ १०९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यांनी केलेले गुन्हे गंभीर असून, त्याबाबत लवकरच महामंडळाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले.

विलीनीकरणाची मागणी आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर चप्पल, दगडफेक करून आंदोलन केल़े  याप्रकरणी न्यायालयाने १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी अन्य काही कर्मचाऱ्यांची धरपकडही केली आहे.  एसटी महामंडळाने निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कारवाया मागे घेतानाच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिल ही मुदत दिली आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर परतण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. मात्र, १०९ आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार की नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी, या कर्मचाऱ्यांनी केलेला गुन्हा गंभीर असल्याचे सांगितल़े  त्यांच्यावर सध्या कायदेशीर कारवाई केली जात आहे. एसटी महामंडळाकडूनही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात लवकरच महामंडळातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

दिवसभरात एक हजार कर्मचारी रुजू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटीच्या ८१ हजार ८६ कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत प्रत्यक्ष ४६ हजार एसटी कर्मचारी संपात असून, त्यात २१ हजार ९०६ चालक आणि १६ हजार ८९९ वाहकांचा समावेश आहे. ७ हजार ३९७ चालक आणि ७७७१ वाहक कामावर रूजू आहेत. शनिवारी एक हजार १३ कर्मचारी रूजू झाल़े  त्यात ७०० पेक्षा जास्त चालक, वाहक आहेत. सर्वाधिक कर्मचारी हे ठाणे विभागातील असून, त्यांची संख्या १०० आहे.