Mukesh Ambani Death Threat Email: उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक, राजवीर खंत हा २१ वर्षीय तरुण पोलिसांचाच पुत्र असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे. मुंबई गुन्हे शाखेने उघड केले की, राजवीरने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या नावाने एक ईमेल आयडी तयार केला होता ज्यावरून त्याने अंबानींना धमकीचा मेल पाठवला होता. राजवीरचे वडील हे गुजरात पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. त्याला शनिवारी गांधीनगरमधील कलोल येथून अटक करण्यात आली. २७ ऑक्टोबर रोजी त्याने पहिला ईमेल पाठवून अंबानींना २० कोटी रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक क्रिकेट सामना सुरू असताना त्याने shadabkhan@mailfence हा आयडी तयार केला. त्यावेळी खान फलंदाजी करत होता आणि त्याने ४६ धावा केल्या होत्या, तो सामना पाहत असताना त्याला अशाप्रकारे खंडणीच्या मेलची कल्पना सुचल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. ज्या दिवशी धमकीचा ईमेल पाठवण्यात आला त्या दिवशी देशभरातील १५० अन्य लोकांनी मेलफेन्सचा वापर केल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले. या सर्व वापरकर्त्यांची तपासणी करण्यात आली व अंबानींना आलेला ईमेल गांधीनगरवरून आल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी सांगितले की खंतने इन्कॉग्निटो मोडमधून डार्क वेबवर यासंबंधित बराच तपास केला होता. तिथेच त्याला हे समजलं की. मेलफेन्स नावाच्या ईमेल प्रदाता कंपनीचा सर्व्हर बेल्जियममध्ये आहे आणि ही फर्म आपल्या ईमेल वापरकर्त्यांची माहिती कोणाशीही शेअर करत नाही. खंतने आपला पत्ता लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला होता.

दरम्यान, बीकॉमचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या खंतने अंबानींना पाच धमकीचे ईमेल पाठवले. पहिल्या ईमेलमध्ये त्याने २० कोटी रुपयांची मागणी केली, दुसऱ्या ईमेलमध्ये ही मागणी २०० कोटी रुपये आणि नंतर ४०० कोटी रुपये इतकी वाढली होती.

हे ही वाचा<< रश्मिका मंदानाच्या ‘या’ आक्षेपार्ह Video साठी वापरलं ‘डीपफेक तंत्रज्ञान’! खऱ्या मॉडेलचं नाव जाणून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरा आरोपी, गणेश रमेश वनपर्धी हा १९ वर्षीय कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे, त्याने अंबानींना जीवे मारण्याची धमकी देऊन ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती. गुन्हे शाखेने त्यालाही अटक केलेली आहे. तेलंगणातील वारंगल येथून अटक करून त्याला गावदेवी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, वनपर्धी याने अंबानींना ४०० कोटींची धमकी मिळाल्याची बातमी एका वाहिनीवर पाहिली तेव्हा त्याने ५०० कोटी रुपयांची मागणी करणारा ईमेल (जीमेल वापरून) पाठवला. अटक केलेले दोन्ही आरोपी ८ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत.